साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांकडून मागील हंगामात आकारण्यात आलेल्या कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. त्यामुळे रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) होणाऱ्या वजावटीत पारदर्शकता येणार आहे.
शेतकऱ्यांनाही आपल्या ऊस बिलातून किती वजावट होते, याचा अंदाज घेऊन कोणत्या कारखान्याला ऊस गाळपासाठी द्यायचा, याचा निर्णय यामुळे घेता येणार आहे.
साखर आयुक्त कुणाल खेमणार म्हणाले, शेतकरी संघटना आणि शेतकरी अनेकदा ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाबाबत शंका उपस्थित करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या ऊस बिलातून किती वजावट होते. याची माहिती मिळावी.
एखाद्या कारखान्यांची वजावट जास्त असेल, तर पर्यायी कारखान्याला ऊस घालता येणार आहे किंवा शेतकरी स्वतः ऊसतोडणी करून आपला ऊस कारखान्याला नेऊन घालू शकतात.
एकूण ऊस बिलाबाबत पारदर्शक व्यवहार होण्यासाठी आयुक्तालयाने जाहीर केलेली कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च उपयोगी ठरणार आहे.
श्री वृद्धेश्वर कारखाना वजावट सर्वांत कमी
• राज्यात श्री वृद्धेश्वर साखर कारखाना, अदिनाथनगर अहमदनगर या कारखान्यांचा तोडणी आणि वाहतूक खर्च सर्वांत कमी म्हणजे ६६२.३२ रुपये प्रतिमेट्रिक टन इतका आहे.
• सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापुरातील कारखान्यांची ही वजावट साधारणतः ७०० ते १२०० रुपये प्रतिमेट्रिक टन आहे. हीच वजावट मराठवाडा आणि विदर्भात काहीशी जास्त आहे.
• सर्वात जास्त तोडणी आणि वाहतूक खर्च १३३४.९८ प्रति मेट्रिक टन रुपये नाशिक जिल्ह्यातील एम. जे. शुगर डिस्टलरी अँड पॉवर प्रा. रावळगाव या कारखान्याचा आहे.
असा ठरतो ऊस तोडणी, वाहतूक खर्च
कारखान्यांच्या परिघात उसाचे क्षेत्र जास्त असेल, तर वाहूतक खर्च कमी येतो. मुळात ऊसतोडणी खर्चात फारसा फरक येत नाही. मात्र, वाहतूक खर्चात कारखानानिहाय जास्त फरक दिसून येतो. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र जास्त आहे. कारखान्यांच्या पाच ते दहा किलोमीटर परिघातीलच ऊस अनेक कारखान्यांना संपत नाही. त्यामुळे या जिल्ह्यांत वजावट कमी असते. याच्या उलट मराठवाडा आणि विदर्भात उसाचे क्षेत्र कमी असते. कारखान्यांना पुरेसा ऊस मिळण्यासाठी सुमारे ४०-५० किलोमीटर अंतरावरून ऊस आणावा लागतो. या कारखान्यांना वाहतुकीवर जास्त खर्च करावा लागतो.
अधिक वाचा: साखर कारखान्यांचा हंगाम सुरू पण किती मिळणार पहिली उचल