बाळकृष्ण पुरोहित
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. हंगाम सुरू करताना कारखान्यांसमोर साखर कामगारांना पगारवाढ, शेतकऱ्यांना उसाचा दर, तसेच विधानसभा निवडणूक असल्याने ऊसतोड मजुरांची उपलब्धता आदी प्रश्न आहेत.
सन २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी केली आहे. मागील महिन्यात बॉयलर अग्निप्रदीपन झाले. हंगाम सुरू होण्यापूर्वी पगारवाढ मिळावी, अशी साखर कामगारांची मागणी आहे.
मात्र, अद्यापपर्यंत याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे जो कारखाना सर्वाधिक दर देणार त्यालाच ऊस देणार, अशी बहुतांशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका आहे.
विधानसभा निवडणूक असल्याने बहुतेक साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे अनेक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेळेत सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. यंदा बहुतांशी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची टंचाई आहे. तसेच गेल्या काही दिवसांत कारखान्यांना ऊसतोड कामगारांचीही टंचाई भासत आहे.
त्यामुळे काही कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी आहे, तर काही कारखान्यांचे हंगाम लवकर बंद होतील. या आठवडाभरात पाऊस पडला नाही तर हार्वेस्टरने ऊसतोडणी सुरू होणार आहे.
दरम्यान, बहुतांशी शेतकऱ्यांनी दोन ते तीन कारखान्यांकडे उसाची नोंद केलेली आहे. त्यामुळे जो कारखाना जादा भाव देणार, त्याचा आम्ही ऊस देणार, असा शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे यंदा कारखान्यांना स्पर्धक कारखान्यांपेक्षा कमी दर देऊन चालणार नाही.
अधिक वाचा: Us Lagwad : उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड तंत्रात करा हे बदल