राम मगदूम
चालू गळीत हंगामातील ऊस गाळपात 'ओलम' हा खासगी कारखाना ऊस गाळपात कोल्हापूरच्या गडहिंग्लज विभागात आघाडीवर आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पिछाडीवर आहे.
'ओलम'ने २ लाख ५४ हजार मे. टन उसाचे गाळप करून २ लाख ३४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नलवडे गडहिंग्लजने ९१ हजार मे. टन उसाचे गाळप करून ९१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
यंदा गडहिंग्लज विभागातील पाचही कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३१०० रुपये दर दिला आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील कारखान्यांसह संकेश्वर, जैनापूर, नणदी, बेडकिहाळ, निपाणी, शाहू-कागल, हमीदवाडा, संताजी घोरपडे व तांबाळे या कारखान्यांनाही येथील ऊस जातो.
यावर्षी विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. त्यापूर्वी कर्नाटकातील कारखान्यांना बराच ऊस गेल्यामुळे आणि यावर्षी उसाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पाचही कारखान्यांसमोर गाळपाची उद्दिष्टपूर्ती करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
७ जानेवारीअखेर गाळपाची स्थिती
साखर कारखाना | मेट्रिक टन | उत्पादित साखर | सरासरी उतारा |
ओलम राजगोळी | २.५४ | २.३४ | ११.१८% |
इकोकेन म्हाळुंगे | १.८९ | २.१० | ११.५७% |
'अथर्व-दौलत' हलकर्णी | १.९९ | १.९६ | ११.४९% |
आजरा | १.७० | १.९० | ११.४०% |
गडहिंग्लज | ०.९१. | ०.९१. | १०.६५% |
■ 'अथर्व-दौलत'ने २१ लाख २ हजार लिटर स्पिरीटचे, तर ४ लाख ६३ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. गडहिंग्लज कारखान्यात ४ लाख ६३ हजार स्पिरीटचे उत्पादन झाले आहे.
■ 'ओलमच्या इथेनॉल व स्पिरीट निर्मिती प्रकल्पाची उभारणी गतीने सुरू असून, येत्या फेब्रुवारीमध्ये प्रकल्पाची उत्पादन चाचणी घेण्यात येणार आहे.
उत्पादनात घट
गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ऊस लागण क्षेत्र कमी करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागण केली नाही. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व घटप्रभेच्या महापुराचा नदीकाठच्या उसाच्या वाढीला फटका बसला असून, खोडव्याचे ऊस क्षेत्र अधिक असल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक