गडचिरोली : बहुतेकदा शेतकरी बांधव हरभरा पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३५ सेंटिमीटर ठेवतात व सलग पेरणी करतात. त्यामुळे पिकामध्ये दाटी होऊन उत्पादनात घट येते. कमी उत्पादकता असण्याचे हे खूप मोठे कारण आहे. त्यामुळे हरभरा पिकाची पेरणी पद्धत बदलावी, हरभऱ्याच्या सहा ते सात रांगेनंतर एक रांग रिकामी ठेवावी. या पद्धतीला पट्टा पेरणी पद्धत म्हणतात. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदा खरिपात काही शेतकरी बांधवांनी सोयाबीन आणि तूर पिकांमध्ये सुधारित पद्धतीने पेरणी करण्यावर भर दिला. ज्यांनी सुधारित पद्धतीने सोयाबीनची लागवड केली, त्यांना बऱ्यापैकी उत्पन्नाचा लाभ झालेला आहे. तूर पीक बेडवर पेरल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. आता याच पद्धतीने रबी हंगामामध्ये हरभरा सुधारित पेरणी पद्धतीने करणे गरजेचे आहे.
विविध समाजमाध्यमांवर हरभरा पिकाच्या वेगवेगळ्या पेरणी पद्धतीचे व्हिडीओ, लेख दिसून येतात. यंदा हरभरा पीक पेरणी बेडवर बऱ्याच शेतकऱ्यांनी टोकण यंत्राच्या साहाय्याने केली आहे. याआधीसुद्धा यांचे खूप चांगले परिणाम शेतकरी बांधवांना दिसलेले आहेत. एकरी १५ ते १७ क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न बेडवर लागवड पद्धतीने होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीमध्ये सुधारित पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.
मी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने हरभरा पिकाची लागवड करीत होतो. मात्र यंदा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पट्टा पद्धतीनुसार हरभरा पिकाची पेरणी करणार आहे. धान पीक निघाल्यानंतर ही लागवड लवकरच करणार आहे. बियाण्यांची व्यवस्था करून ठेवली आहे. - पांडुरंग भोयर, शेतकरी.
येनापूर- मोहर्ली परिसरात होते अधिक लागवड
चामोर्शी तालुक्याच्या येनापूर, गणपूर रै तसेच मोहर्ली गावाच्या परिसरात रबी हंगामात हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तलावासम असलेल्या मोठ्या बांध्यांमध्ये हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. हलके व मध्यम प्रतिचे धान हाती आल्यानंतर शेतकरी त्याच जमिनीत हरभरा पिकाचे उत्पादन घेतात. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
हेही वाचा : Soil Test : यंदा रबीच्या खर्चात बचत करायची आहे का? मग आजच माती परीक्षण करा