अलिकडच्या काही वर्षात निर्धारित कालावधीपेक्षा कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळविण्याच्या हव्यासापायी प्रत्येकच पिकाला रासायनिक खत देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यातून उत्पादित धान्य, भाजीपाला सेवनाने आरोग्यविषयक विविध समस्या उद्भवत आहेत.
त्याचप्रमाणे रासायनिक खताचे अंश जलस्त्रोतांमध्ये देखील मिसळले जाऊन जलस्त्रोतांमध्ये 'नायट्रेट'चे अंश आढळत असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून प्राप्त झाली.
पाणी हेच जीवन असल्याचे मानले जाते; मात्र सद्या खात्रीलायक शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना नळाव्दारे पाणीपुरवठा केला जात असला तरी दुर्गम भागात आजही विहीर, कुपनलिका, हातपंपाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. या पाण्यावर कुठलीही विशेष प्रक्रिया केली जात नाही.
तसेच नळाद्वारे पुरविण्यात येत असलेले पाणी देखील अनेकवेळा अशुद्ध असते. त्यातच आता पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत असल्याने जमिनीतील जलस्त्रोतांमध्ये खतांमधील 'नायट्रेट'चे घटक मिसळल्याचे तपासणीत उघड होत आहे. ही धोक्याची घंटा असून वेळीच सावरले नाही तर फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
काय आहेत पाण्यातील 'नायट्रेट'चे धोके !
• पिण्याच्या पाण्यात 'नायट्रेट'चे प्रमाण अधिक असल्यास विशेषतः नवजात बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
• असे पाणी उकळून, गाळून प्यायले तरी त्यातील 'नायट्रेटच्या अंशाचे प्रमाण कमी होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रासायनिक खतांचा अतिवापर कारणीभूत !
शेती पिकासाठी सर्रास रासायनिक खते वापरली जात आहेत. पिकाला पाणी दिल्यानंतर खताचे अंश खाली उतरून जमिनीतील पाण्यात मिसळतात. परिणामी, पिण्याच्या पाण्यात खतातील 'नायट्रेट'चे अंश आढळून येत आहेत.
पाण्यातील 'नायट्रेट' हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हृदयाची गती अचानक वाढणे, मळमळ होणे, डोकेदुखी आणि ओटीपोटीत दुखण्याचा त्रास मागे लागू शकतो. नवजात बालकांसाठी असे पाणी धोकादायक ठरू शकते. - डॉ. हरीश बाहेती, बालरोगतज्ज्ञ, वाशिम.
हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान