Join us

निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 9:56 AM

उन्हाळ्यात निंबोळी गोळा करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

खरीप हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी वारंवार करावी लागते. कीटकनाशकांच्या किमती वाढल्यामुळे बराच खर्च वाढतो. हा खर्च टाळण्याकरिता निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याकरिता उन्हाळ्यातच निंबोळी गोळा करण्याची आवश्यकता आहे.

पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काची २ हेक्टर कपाशी, तूर, हरभरा पिकांवर दोनवेळा फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चात २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होते. तसेच पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी, बियाण्याची उगवण क्षमता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे.

यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. मध्यम, खोल आणि उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :शेतीशेतकरीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनखते