संतोष भिसेसांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत.
हजारो मजुरांची वाहने, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या रस्त्यावर दिसू लागली आहेत. कारखाना परिसरात त्यांच्या झोपड्या उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे साखर कारखानदार निवांत झाले असले, तरी राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील मतदानाकडे पाठ फिरवून मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. स्थलांतरामुळे मजुरांचे मतदान होऊ शकणार नाही, याचा फटका तेथील उमेदवारांना बसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ७० हजारहून अधिक ऊसतोड मजूर विदर्भ मराठवाडा आणि विजापूर जिल्ह्यांतून येतात. प्रामुख्याने बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून मजूर येतात. दिवाळी संपताच त्यांचा प्रवास कारखान्यांकडे सुरू होतो.
मार्चमध्ये हंगाम संपताच परततात. सध्या महाराष्ट्रभरात निवडणुका सुरू असल्याने या स्थलांतरित मजुरांच्या मतदानाची चिंता राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आहे. त्यांचे मतदान बुडणार असल्याने फटका बसणार आहे.
निकालावरही परिणाम होणार आहे. मतदार जिल्ह्याबाहेर निघून गेल्याने एकूण मतदानाची टक्केवारी घसरणार आहे. प्रशासनालाही या घटत्या टक्केवारीची चिंता आहे.जिल्ह्यात स्थलांतरित होऊन येणाऱ्या या मजुरांच्या मतदानाविषयी सांगली जिल्हा प्रशासन मात्र हतबल आहे.
यंदा पाऊस चांगला, थोडं थांबामराठवाड्यातील ऊसतोड मजुरांच्या पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतराविषयी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. १२ ऑक्टोबररोजी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात याची जाहीर वाच्यता केली. मजुरांना आवाहन करताना म्हणाल्या, यंदा मराठवाड्यात, आपल्या जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे मजुरांनी मतदारसंघातच थांबावे. शेतीत लक्ष घालावे. निवडणूक पार पाडावी. मतदान सोडून साखर कारखान्यांकडे पळू नये. मुंडे यांच्या आवाहनानंतरही हजारो मजूर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत येतच असल्याचे दिसत आहे.