Join us

Utane Business : धुळ्याचे उटणे मुंबईच्या बाजारपेठेत पोहचले, महिलांना गावातच रोजगार  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 4:49 PM

Utane Business : अक्कलकोस गावाने ग्रामरोजगार उपक्रमांतर्गत दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी लागणारे उटणे बनवले. हे सुगंधित उटणे पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पोहचले.

धुळे :धुळे जिल्ह्यातील (Dhule District) शिंदखेडा तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहूल अक्कलकोस गावाने ग्रामरोजगार उपक्रमांतर्गत दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी लागणारे उटणे (Diwali Utane) बनवले. हे सुगंधित उटणे पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पोहचले. यावर्षी याला मोठी मागणी आहे. यामुळे अक्कलकोस गावाची वाटचाल आत्मनिर्भर गावाकडे सुरू झाली आहे. शिवाय गावातील मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. 

हा येथील ग्रामविकास विभागाचा एक स्तुत्य उपक्रम असून, यामुळे गावातील मजुरांचे स्थलांतर काहीअंशी थांबले आहे. त्यांच्याच पुढाकाराने शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस या आदिवासीबहूल गावात दिवाळी (Diwali 2024) निमित्ताने अभ्यंगस्नानासाठी लागणारे उटणे तसेच होळी रंगपंचमी सण, उत्सव साजरा करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे रंग निर्मितीचे काम होत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध झाल्या, त्यामुळे रोजगारासाठी होत असलेले स्थलांतर काहीअंशी रोखले गेले आहे. 

यावर्षी बाजारपेठनिर्मित नैसर्गिक रंगांना तसेच उटण्याला मोठी मागणी आहे. तालुक्यातील दुर्गम राज्याच्या मुख्य भागातील या वस्तू बाजारपेठेत पोहचल्याने अक्कलकोस गावाची वाटचाल आत्मनिर्भर गावाकडे सुरू झाली आहे. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. शिवाय स्वता विक्री करत असल्याने ग्राहक व उत्पादक यांच्यातला तिसरा घटक दुकानदार बाजूला होऊन दोन पैसे जादा मिळतात. गावातच रोजगार मिळत असल्याने स्थलांतराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. 

दोंडाईचा येथील कारखान्यातून पावडर आणून मेड इन हर्बल विविध प्रकारचे रंग तसेच उटणे तयार केले जाते. दोन वर्षापासून हा उपक्रम येथील महिला वर्गाने हाती घेतला आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक उटणे रंगाची निर्मिती करून अक्कलकोसने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. या उटण्याची राज्यभर विक्री होत असून, मोठी मागणी आहे. शिवाय येथील महिलांचा आदर्श घेऊन इतर गावांमध्येही असे ग्रामरोजगार सुरू करण्याचा मानस आहे. - प्रफुल्ल साळुंखे, ग्रामविकास विभाग

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीदिवाळी 2024धुळे