Join us

'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाब उत्पादकांची खुलली कळी; गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:54 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे.

सतीश सांगळेकळस : निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे.

येथील शेतकऱ्यांनी या आठवड्यात सुमारे ५० हजार फुलांची विक्री केली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'मुळे दरात दुप्पट वाढ झाल्याने या फुलांनी जास्तच भाव खाल्ला आहे.

यामुळे गुलाब उत्पादकांची कळी खुलली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला न बोलता, फक्त फुलांमधून तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. यामुळे मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांची पत आणि शेतीचा पोत कमी होत आहे. त्यातच निसर्गाचा माराही सहन करावा लागतो. परंपरागत शेतीने अनेक शेतकरी उ‌द्ध्वस्त झाले.

मात्र, येथील शेतकऱ्यांनी आपल्या श्रमातून गुलाबाची शेती फुलवली आहे बाजारपेठेचा उत्तम अभ्यास, विक्रीचे कुशल तंत्र आणि त्यासाठी लागवडीचे चोख व्यतस्थापन यातून त्यांनी दर्जेदार गुलाबाची बागच नव्हे तर त्यातून यशदेखील फुलवले आहे.

गुलाबाची शेती किमान सहा वर्षे टिकत असल्याने जमिनीची चांगली मशागत करावी लागते. या परिसरात 'ग्लॅडिएटर' या जातीचे उत्पादन जास्त घेतले जाते. ग्लॅडिएटर फुल गडद लाल रंगाचे असते, दांडाही मोठा असतो. 

सध्या फुलशेती महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे. यामध्ये गुलाबशेती हा महत्त्वाचा उद्योग होऊ शकतो. सर्व फुलांमध्ये गुलाबाला वरचे स्थान आहे. गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हटले जाते.

अत्तर, सुगंधी तेल, गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक असून, उत्तम टॉनिक आहे. गुलाबाची फुले केशश्रृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात.

गुलाबाचा दर आकर्षक रंग आणि गुणवत्तेवर ठरतो. बाजारपेठेत गुलाबाला वर्षभर विशेषतः गणपती, नवरात्र, दिवाळी, शिक्षक दिन, व्हॅलेंटाईन डे यावेळी मागणी चांगली, दरही चांगला मिळतो. सरासरी दोन रुपयाला एक फूल विकले गेले तर नफा चांगला राहतो. मात्र, 'व्हॅलेंटाईन डे'ला चार रुपये बाजारभाव बोरडेक्स जातीला मिळाला आहे. - धनंजय मोहोळकर, फुल उत्पादक, कळस 

टॅग्स :फुलशेतीशेतकरीशेतीफुलंपीकव्हॅलेंटाईन्स डेइंदापूर