कृषि विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने बुधवार (दि.०१) रोजी ९८ व्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हिके पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे हे होते.
शेतकरी बांधवांना शेतीतुन अधिक उत्पादन येणे हे अपेक्षितच असते. परंतु त्यासोबतच शाश्वत उत्पादन घेणे आवश्यक आहे. आज जमिनीच्या आरोग्याकडे शेतकरी बांधवांना दुर्लक्ष करुन जमणार नाही. दर्जेदार व शाश्वत उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीचे आरोग्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे, असे मत यावेळी डॉ झाडे यांनी मांडले.
तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सुरुवात ही माती परिक्षणापासुन करणे गरजेचे आहे. यावरुन आपणाला जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण शिफारशीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करु शकतो. हिरवळीची खते, पिकांचे अवशेष जमिनीतच कुजवणे, गांडुळखत व इतर सेंद्रिय खतांचा योग्य व शिफारशीत वापर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
यासोबतच पिकाच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्य, पाणी यांचा पुरवठा केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जमिनीच्या आरोग्यानुसार परिणाम करु शकतात. यासोबत पिक फेरपालट, आंतरपिकांची लागवड यांचाही शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. यासोबतच कृषि विज्ञान केंद्रानी निर्मित केलेल्या जैविक द्रवरुप जिवाणू संघ (N.P.K.) व जैविक किड व रोगनाशके बायोमिक्स याचा अवलंब करावा. असेही डॉ झाडे यांनी सांगितले.
कृषि विज्ञान केंद्राद्वारे आयोजित या कार्यक्रमात विषय विशेषज्ञ डॉ. संजुला भावर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतुरकर, कृषि महाविद्यालय, गेवराई तांडा येथील सहायक प्राध्यापक डॉ. योगेश पाटील व शेतकरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
तसेच यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भावर म्हणाले कि, मराठवाड्यात मिरची लागवडीसाठी परभणी तेजस परभणी मिरची, PBNC-17, PBNC-16, पुसा ज्वाला, अर्का हरिता, अर्का मेघना या वाणांची निवड करावी. लागवडीपुर्वी १०-१२ टन प्रति एकरी शेणखत टाकावे. लागवडीपासुन ३० दिवसामध्ये 19:19:19 ०६ किलो हे. तीन समान विभाजीत पिकास विभागुन द्यावे. नंतर ३०-४५ दिवसांत 12:61:00 हे. ०६ किलो तीन समान हफ्यात विभागुन द्यावे.
४५-६० दिवसामध्ये 13:40:13 हे. ०६ किलो हे तीन समान हप्त्यात विभागुन द्यावे. तसेच मॅग्नेशिअम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट, फेरस सल्फेट प्रत्येकी ०५ किलो प्रति एकरी हे मिरची पिकास फुलोरा अवस्थेत द्यावे. तसेच बोरॉन प्रति महिना २५० ग्रॅम/ एकर फुलोरा सुरु झाल्यानंतर द्यावे. लागवडीसाठी ३०-५० मायक्रॉन जाडीची मल्चिंग पेपर वापरावा तसेच किड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. यावेळी विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतुरकर यांनी सद्यस्थितीतील पशुधन व्यवस्थापनाविषयी माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे, सचिन हुड यांनी नियोजन केले.
हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी