Join us

दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन काळाची गरज

By बिभिषण बागल | Published: August 20, 2023 10:00 AM

गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ते १९ ऑगस्ट, २०२३ या दरम्यान गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डॉ. धीरज शिंदे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि डॉ. मिलिंद जोशी, विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामती उपस्थित होते. डॉ. धीरज शिंदे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन हि काळाची गरज आहे त्याकडे जास्तीत जास्त उद्योजकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आव्हान केले.

डॉ. रतन जाधव विषय विशेषज्ञ (पशु संवर्धन), कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने गाई-म्हशीसाठीचा आदर्श गोठा केला तर निश्चित फायदेशीर ठरतो हे सांगताना मुक्त संचार पद्धतीचा गोठा व त्याचे व्यवस्थापन, जनावरांच्या योग्य जातीची निवड याबद्दल मुद्देसूद माहिती दिली. डॉ.सचिन सोरटे यांनी दुग्ध व्यवसायासाठी व संगोपनासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधांची माहिती दिली. तसेच दुग्धनिर्मितीमधील पौष्टिक पशुखाद्य, नियमित चारा व्यवस्थापन व लसीकरणाचे महत्व आणि त्यासंदर्भातील सर्व घटकांचे विश्लेषण केले. डॉ. आशिष रासकर यांनी दुधातील विविध घटक पदार्थ तसेच दुधाचे नमुने त्यामधील स्निग्ध पदार्थ आणि सॉलिड नॉट फॅट(SNF) यांसारख्या प्लॅटफॉर्म चाचण्या यांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर दुग्धप्रक्रियेमधील पाश्चरायझेशन आणि  एकजिनसीकरण या महत्वाच्या घटकांची सखोल माहिती दिली.

डॉ. मिलिंद जोशी, विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी देशी गोवंश सुधारणा प्रकल्प तसेच दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया संदर्भातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) याबद्दल परिपूर्ण माहिती देत, कृषी विज्ञान केंद्रात चालू असणाऱ्या विविध प्रकल्पांची देखील यावेळी माहिती दिली. डॉ. श्रीकांत गोरे यांनी दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करताना यंत्रसामग्रीवरील खर्च व प्रक्रियेच्या अत्यंत सोप्या व सहज पद्धती याची माहिती दिली. तसेच खवा, बासुंदी, दही, पनीर व तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिकासह विश्लेषण केले.

प्रशांत गावडे, प्रशिक्षण समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. सचिन क्षीरसागर यांनी सदर प्रशिक्षणाचे नियोजन केले. 

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री. सुनील भाऊ चांदेरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांसोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राबवीत असलेले विविध प्रकल्प, शेतकऱ्यांसाठीच्या कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना इ. बद्दल चर्चा करत सदर विषयांतील शंका निरसन करून प्रमाणपत्रांचे वाटप केले व आभार मानले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी संदीप जगताप यांचेसह मुळशी तालुक्यातील १७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :दुग्धव्यवसायगायकृषी विज्ञान केंद्रबारामतीशेतकरीशेती