छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये विकलेल्या कांद्यापोटी व्यापाऱ्याने दिलेले ८ लाख रुपयांचे धनादेश वटले नसल्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना रोख ८ लाख रुपये देण्याची नामुष्की व्यापाऱ्यावर ओढवली.
शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर- मुंबई महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केट आहे. सद्य:स्थितीत हे मार्केट आठवड्यातील सातही दिवस चालू असते. या मार्केटमध्ये गोणी व मोकळा कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीने वेगवेगळे वार ठरवून दिले आहेत. कांदा मार्केटमधील जय सद्गुरू ट्रेडिंग कंपनीने १५ शेतकऱ्यांकडून सोमवारी कांदा खरेदी करून त्यापोटी त्यांना ८ लाखांचे धनादेश दिले होते. हे धनादेश शेतकऱ्यांनी बँकेत जमा केल्यानंतर ते वटलेच नाहीत.
याबाबत बँकेतून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी धनादेश घेऊन बाजार समितीकडे धाव घेत तक्रारी केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जय सद्गुरू ट्रेडिंग कंपनीचे विलास रोहोम यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत रोख रक्कम पाठवून शेतकऱ्यांना अदा केली. त्यानंतर शेतकरी शांत झाले.
काय आहे नियम ?
काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने धनादेशाबाबत अडत व्यापाऱ्यांचे कान टोचले होते. धनादेश बाउन्स प्रकरणे वाढत चालल्याने बाजार समितीने, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्याच दिवसाचा धनादेश देण्याचे आदेश दिले होते. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना त्याच दिवसाचा धनादेश देणे बंधनकारक असतानाही अनेक अडत व्यापाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे.
बहुतांश व्यापाऱ्यांचे धनादेश बाउन्स होत असताना याकडे बाजार समिती प्रशासन गांभीर्याने पाहावयास तयार नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे दिलेले धनादेश वटले नाहीत. ८ ते १० शेतकऱ्यांचे एकूण आठ लाख रुपयांचे धनादेश होते. शेतकऱ्यांना रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली. - विलास रोहोम, अडत व्यापारी
कांदा विक्रीपोटी दिलेले धनादेश बाउन्स झाल्याचे प्रकरण ऐकायला मिळाले होते. जवळपास १५ शेतकऱ्यांचे पैसे अडत व्यापाऱ्याकडे अडकले होते; परंतु संबंधित व्यापाऱ्याने ही रक्कम रोख स्वरूपात चुकती केल्याचे समजते. - चंचल मते, कर्मचारी, कांदा मार्केट