Lokmat Agro >शेतशिवार > कृषी विभागामार्फत देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार

कृषी विभागामार्फत देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार

Various agricultural awards given by the Department of Agriculture | कृषी विभागामार्फत देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार

कृषी विभागामार्फत देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार

महाराष्ट्र राज्य कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात ...

महाराष्ट्र राज्य कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात ...

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्य कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभुषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभुषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषि विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार इत्यादि पुरस्कार मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

१) जिजामाता कृषिभुषण पुरस्कार
स्वरुप:
जिजामाता कृषिभुषण हा पुरस्कार केवळ महिला शेतकऱ्यांसाठी असून विजेत्या महिलेला रु.५०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह ( ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे) ०८
निकष:
- राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील तथापि, केंद्र किंवा राज्यशासनाचा कोणताही कृषि पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य देण्यात यावे.
- महिला शेतकरी यांच्या स्वतःच्या नावावर किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि त्या कुटुंबीयासह शेती करणाऱ्या असाव्यात.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

२) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
स्वरुप:

वसंतराव नाईक शेतीमित्र हा शेती क्षेत्रात प्रभावीरीत्या विस्तार कार्य कारणाऱ्या व्यक्ति/संस्था/ वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दूरचित्रवाहिन्या यांना दिला जातो. संबंधित व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर ७/१२ असावा, असे बंधन नाही. मात्र शेतकरी असल्यास त्यास प्राधान्य देणेत येईल. या पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याला रु. ३०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह ( ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे) ०८
निकष:
- कृषिविषयक दैनिक/साप्ताहिक/मासिकामधुन अभ्यासपूर्ण लेख, कृषि विषयक योजनांची प्रचार प्रसिद्धी, शेतकऱ्यांच्या यशोगाथा इ. बाबतची माहिती देणाऱ्या तसेच प्रिंट/इलेक्ट्रॉनिक यांसारख्या समाज माध्यामांचा वापर करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन कृषि विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ति/संस्था/वृत्तपत्र/साप्ताहिके/मासिके/दूरचित्रवाहिन्या इत्यादींचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात यावा.
- शासनाच्या कृषि विषयक धोरणांचा प्रचार व प्रसिद्धीमध्ये सक्रिय सहभागी असावेत.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्ष इतके असावे.

३) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
स्वरूप:
-
 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु.११,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- देण्यात येणारे पुरस्कार संख्या ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग ०१ याप्रमाणे ०६ असे एकूण ४०)
निकष:
-
शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि तो कुटुंबीयासह शेती करणारा असावा. यासाठी प्रस्तावासोबत ७/१२,८-अ जोडणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याच्या उदरनिर्वाह/चरितार्थाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे हे संबंधित शेतकऱ्याने स्वप्रमाणित करावे.
- प्रस्तावित शेतकरी हा एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणारा असावा.
- यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, गांडुळ खत युनिट,इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

४) कृषिभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार
स्वरूप:

- सेंद्रीय शेतीमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या शेतकरी/संस्थेला कृषिभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देण्यात येतो. विजेत्या संस्था/शेतकऱ्याला रु.५०,००० /- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- देण्यात येणारे पुरस्कार संख्या (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे) ०८
निकष: वैयक्तिक निकष
- सेंद्रिय शेतीचे पीजीएस किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणिकरण केलेले असावे.
- सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रसाराबाबत सेंद्रिय शेतीबाबतचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, त्याबाबतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्वत: सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून कार्यशाळांमधून प्रदर्शनामधील सहभाग, सेंद्रिय शेती प्रचार व प्रसारासाठी कार्य केलेले असावे.
- स्वतःचा शेतमाल सेंद्रिय म्हणून विक्री केलेली असावी. तशा पद्धतीचा ब्रँड असल्यास तपशील द्यावा.
- गांडूळ कल्चर/गांडूळ खत युनिटच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार करुन त्याचा वापर स्वतः करणारा असावा तसेच इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देणारे असावेत.
- पिक संरक्षणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन, जैविक किटकनाशके, विविध पिक पध्दती, वनस्पतीजन्य किटकनाशके यांचा वापर करणारे असावेत.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

५) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
स्वरूप:

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषि विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या व्यक्ति/गट/संस्थेस रु.७५०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह ( ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या - १
निकष:
-
 कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती /गट/संस्थेला पुरस्कार देण्यात यावा. प्रस्तावित व्यक्ती/गट/संस्था यांनी केलेले कार्य संपुर्ण राज्याला दिशादर्शक आणि अतिउल्लेखनिय असावे.
- प्रस्तावित व्यक्ती / गट / संस्था यांना केंद्र किंवा राज्यशासनाचा कोणताही कृषि पुरस्कार प्राप्त झालेला असावा.
- शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटबयासह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०५ वर्षे इतके असावे.

६) वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार
स्वरूप:

वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु.५०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे) ०८
निकष:
प्रस्तावित शेतकरी हा कृषि क्षेत्रात उल्लेखनिय-कार्य केलेला व केंद्र किंवा राज्यशासनाचा कोणताही कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी असावा.
- शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयासह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.
- शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

७) उद्यानपंडीत पुरस्कार
स्वरूप:
फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या शेतकऱ्याला उद्यानपंडीत पुरस्कार देण्यात येतो. विजेत्या शेतकऱ्याला रु.२५,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या - (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे) ०८
निकष:
पुरस्कारासाठी निवडावयाचा शेतकरी हा स्वतः आधुनिक पध्दतीने फलोत्पादन पिके (फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, सुगंधी औषधी वनस्पती इ.) घेणारा असावा, ही प्रमुख अट असल्याने प्रस्तावित शेतकऱ्याच्या नांवे शेती असावी. यासाठी प्रस्तावासोबत चालू वर्षातील ७/१२ व ८-अ उताऱ्यांवर प्रस्ताव तपशिलाच्या अनुषंगाने फलोत्पादन पिकांच्या नोंदी असणेही आवश्यक आहे. त्याचे फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असावे.
फलोत्पादनांतर्गत यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बिजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकहाऊस, साठवणुक, मुल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इ. कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.
शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

८) युवा शेतकरी पुरस्कार
स्वरुप:
युवा शेतकरी पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु. ३०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह ( ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- देण्यात येणारे पुरस्कार संख्या - ०८ (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे)
निकष:
प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकऱ्याचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
शेतकऱ्याच्या स्वतः च्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शेती असावी आणि तो स्वतः कुटुंबीयासह शेती करणारा असावा. (आई-वडील, पती/पत्नी यांचेपैकी एका कुटुंबियाच्या नावावर शेती असावी.)
शासनाच्या कृषि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान ०३ वर्षे इतके असावे.

९) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार
राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणारे कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी राज्यशासनाव्दारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार या पुरस्काराने मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
स्वरूप
राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणारे कृषि विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना सदर पुरस्कार देण्यात येतो. स्मृतीचिन्ह (ट्रॉफी). प्रशस्तिपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
देण्यात येणारे पुरस्कार संख्या - ०९ (प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे ८ व कृषी आयुक्तालय स्तरावरून १)
निकष
कृषि विभागामध्ये काम करणारे सर्व संवर्गातील-अधिकारी/कर्मचारी जे सेवेत आहेत त्यांची या पुरस्कारासाठी शिफारस करावी.
शिफारस पात्र अधिकारी/कर्मचारी यांची कमीत कमी १५ वर्ष सेवा पुर्ण झालेली असावी.
अधिकारी/कर्मचारी यांना सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव शिक्षा झालेली असल्यास अथवा त्याच्याविरुध्द विभागीय चौकशी चालु अथवा प्रस्तावित असल्यास अथवा तो आधीच्या सेवा कालावधीत निलंबीत झालेला असल्यास त्याचा पुरस्कारासाठी विचार करता येत नाही.

अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

संदर्भ:
शेतकरी मासिक, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Web Title: Various agricultural awards given by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.