Join us

Vasantrao Naik Corporation : अशीही केली शेतकऱ्यांची थट्टा ; वसंतराव नाईक महामंडळाचा कारभार काय आहे प्रकरण वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 10:14 AM

शेतकऱ्यांना कर्ज मिळालेच नाही तरी सुध्दा उलट सातबारावर चढला आहे बोजा त्यामुळे शेतकरी हैराण काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Vasantrao Naik Corporation)

Vasantrao Naik Corporation :

वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी थेट कर्जाचा लाभ दिला जातो. शेतकरी कुटुंबातील युवकांनी एप्रिल २०२२ मध्ये या महामंडळाकडे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला. त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. ते येरझारा मारून त्रस्त झाले. 

तब्बल वर्षभरानंतर डिसेंबर २०२३ मध्ये थेट या शेतकऱ्यांच्या सातबारावर एक लाख रुपये कर्जाचा बोजा चढविण्यात आला. प्रत्यक्ष कर्ज मिळाले नसतानाही हा बोजा लादला गेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अशोक बाळू राठोड, रा. तुळशीनगर, ता. महागाव, अरविंद लिंबाजी राठोड, रा. माळेगाव, ता. महागाव, सुधीर तुकाराम राठोड, रा. बोरगडी, ता. पुसद या शेतकऱ्यांची आर्थिक महामंडळाकडून कर्ज योजनेत फसवणूक झाली आहे.

कर्जाची रक्कम खात्यात जमा न होताच सातबारावर बोजा चढल्याने या शेतकऱ्यांचे इतरही व्यवहार अडचणीत आले आहेत. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाकडून एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. 

महागाव व पुसद तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील युवकांनी या कर्जासाठी रीतसर अर्ज केला. तरीही त्यांना दोन वर्षांपासून कर्जाची रक्कम मिळालेली नाही. या युवकांनी सेतू सुविधा केंद्र, झेरॉक्स सेंटर यासारखा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज मागितले होते.

शासनाच्या आर्थिक विकास महामंडळाडूनच शेतकरी कुटुंबातील युवकांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे.  या गंभीर प्रकाराबाबत सर्वत्र दाद मागितली. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. कर्ज मिळाले नसताना बोजा कसा चढविला, हा प्रश्न कायम आहे.

व्यवस्थापकाने कर्ज न देताच केला पत्रव्यवहार

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी महागाव तालुक्यातील तलाठ्याला पत्र देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावर एक लाख रुपये बोजा चढवावा, असे पत्र २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिले आहे. ही तत्परता जिल्हा व्यवस्थापकांनी दाखविली.  मात्र, कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली की नाही याकडे दुर्लक्ष केले आहे. अजूनही शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना