Join us

vegitable cultivation : वांगी, भेंडी अन् कोबी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती ; मिळतोय हातात पैसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:39 PM

शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतोय त्यामुळे आता कल वाढताना दिसतोय.

छत्रपती संभाजीनगर :

जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांत ४ हजार ४७८ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे.

यात सर्वाधिक २५ टक्के क्षेत्र अर्थात १ हजार ७६ हेक्टरवर वांगी लागवड केली आहे. वांग्याच्या भाजीला मागणी अधिक असते. शिवाय अन्य भाज्यांच्या तुलनेत उत्पादन खर्चही कमी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वांगी लागवडीला पहिली पसंती दिल्याचे दिसून येते.

दुसऱ्या क्रमांकावर भेंडीचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात ७५९ हेक्टरवर भेंडी लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले, तर तिसऱ्या क्रमांकावर पत्ताकोबी आणि फुलकोबीचे क्षेत्र आहे. या दोन्ही प्रकारच्या कोबींची अनुक्रमे ६७७ हेक्टर आणि ६७२ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे.

यानंतर दुधी भोपळ्याची शेतीही सर्वच तालुक्यांत कमी, जास्त प्रमाणात करण्यात येते. जिल्ह्यात २२ हेक्टरवर भोपळा, तर ५३ हेक्टरवर कारल्याची शेती करण्यात येते. ढोबळी मिरची अर्थात शिमला मिरचीची जिल्ह्यात ३३८ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. 

गाजरालाही बाजारात चांगली मागणी असते. जिल्ह्यात २०२ हेक्टरवर गाजराची शेती केली जाते, तर सुमारे १५० हेक्टरवर काकडीचे उत्पादन घेण्यात येते. वाटाणा, मुळा, दोडका आणि रताळ्याचीही शेती केली जाते.

कन्नड : सर्वाधिक भाजीपाल्याचे क्षेत्र

कन्नड तालुक्यात भाजीपाल्याचे सर्वाधिक ८१३ हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. सर्वच प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, मिरची आणि अद्रकची लागवड केली जाते.

भाजीपाला थेट दिल्लीच्या मंडईत

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विविध गावांत उत्पादित टोमॅटोला नवी दिल्लीच्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. दिल्लीतील व्यापारी येथील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून माल घेऊन जातात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीभाज्या