Join us

पावसाअभावी भाजीपाला संकटात; कांदा लागवडीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 12:30 PM

येवला तालुक्यात होरपळ : बागायतीसह खरीप पिके धोक्यात

येवला तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने भाजीपाला संकटात सापडला असून शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीलाही ब्रेक दिला आहे.

जळगाव नेऊर, पाटोदा, मुखेड, अंदरसूल, नगरसूल या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक मका, सोयाबीन, कपाशी आहे. या पिकांबरोबरच पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब, ऊस या बागायती पिकांची ही लागवड केलेली आहे. गेली वर्षभर साठवलेल्या पाण्यावर ही पिके ही तग धरून आहे, पण ऐन पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील मका, सोयाबीन कपाशी, बाजरी, मूग या पिकांबरोबरच बागायती पिकालाही पावसाने दांडी दिल्याने फटका बसला असून हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे.

उभी पिके कोमेजताना पाहून शेतकऱ्यांना मात्र अश्रू अनावर होत आहेत.अर्धा ऑगस्ट महिना संपला तरी वरूण राजा अजून रुसलेलाच असून बळीराजा देवाकडे मोठ्या प्रार्थना करत आहे. आता पिके एकदम बहरात असून पाण्याअभावी सोयाबीनची फुले गळून पडत आहे तर मक्याचा तुरा जागीच थांबला असल्याने आजही पाऊस झाला तरी प्रमाणात खरीप पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे.

पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला असून आतापर्यंत रिमझिम पावसावर पिके तग धरून होती, पण गेली आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस तर सोडाच साधी भुरभुरही येत नस खरिपातील पिके संकटात सापडली. मोठ्या प्रमाणात केलेला खर्च वाया जाणार आहे.आता पाऊस होऊनही उत्पादनात मात्र घट होणार आहे.- किशोर शिंदे, शेतकरी, जळगाव नेऊर

पिकांनी टाकल्या माना

अनेक शेतकऱ्यांनी पावसावर तसेच साठवलेल्या पाण्यावर टोमॅटो, मिरची कोबी मेथी, या भाजीपाला पिकांची लागवड केली. यातून शेतकऱ्यांना चार पैसेही मिळत आहे; पण ऐन मोसमत पावसाने दांडी मारल्याने लाखो रुपये खर्च करून भाजीपाला पिके आज पाण्याअभावी संकटात असून त्यामुळे शेतकरीही भयभीत झाला असून खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा बहुतेक भाग हा मुरमाड आहे, त्यामुळे या भागात येणार आहे. जास्त प्रमाणात पिकांची होरपळ झाली असून पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

टॅग्स :शेतकरीभाज्याकांदापीकशेतीपाऊसपाणीमोसमी पाऊस