Pune : दिवाळीनिमित्त कमी झालेले पालेभाज्या अन् फळांचे दर आता वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे. दिवाळीच्या उत्सवातील एक ते दोन आठवडे राज्यातील मोठ्या शहरातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला खूप कमी दर मिळताना दिसत होता.
दरम्यान, शहरातून दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गावाला स्थलांतर होत असते. त्यामुळे शहरातील गर्दी कमी होऊन ग्राहक कमी होतात. या कारणामुळे पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांची विक्री होत नाही. परिणामी मालाचे दर पडतात आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी होतो. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर शहरातील गर्दी वाढत असल्यामुळे आता पुन्हा भाज्यांचे दर वाढले आहेत.
पुण्यातील मांजरी उपबाजार हा रयत बाजार आहे. येथे थेट शेतकरी ते ग्राहक अशी खरेदी-विक्री होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट माल विक्री करता येतो. सध्या या बाजारात फळांव्यतिरिक्त भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक होत असते. येथे आवक होत असलेल्या मालांचे दर वाढल्याची माहिती बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितली.
दिवाळी मध्ये पडलेल्या दरापेक्षा आता १० ते २० रूपये किलोप्रमाणे दर वाढले असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले आहे.