Join us

आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी; तपासणी पथके बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:35 IST

fal pik vima yojana श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे.

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे.

लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षित क्षेत्र असलेल्यांचा शोध घेण्यासाठी दोन्ही पथके शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. मृग बहार फळपीक योजनेमध्ये तालुक्यात फळबाग नसताना विमा योजनेतील सहभाग उघडकीस आला होता.

तालुक्यामध्ये कुकडी आणि घोड पाटपाण्याच्या आधारामुळे फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानही फायदेशीर ठरत आहे.

परंतु, फळबागांना हवामानातील अचानक होणारे बदल उत्पादनावर परिणाम करणारे ठरत आहेत. त्यामुळे फळबागांना विमा संरक्षण घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

आंबिया बहार फळपीक विमा योजनेमध्ये यावर्षी तालुक्यातून डाळिंब, द्राक्ष, आंबा आणि केळी फळबागांसाठी ७९३ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत.

यामधून ४९५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. या अर्जाची पडताळणी सध्या सुरू असून काही दिवसांत बोगस अर्जाचा शोध घेण्यात येईल. 

मृग बहार फळ विमा योजनेमध्ये एक हजार ९४७अर्ज आले होते. त्यामध्ये ९५८ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. पडताळणीमध्ये एक हजार ६५९ शेतकऱ्यांचे ७८५ हेक्टर क्षेत्र योग्य ठरले होते. 

१३६ शेतकऱ्यांनी लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र विमा संरक्षित केले होते, तर १५२ शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये फळबाग आढळून आली नव्हती. १०६ हेक्टर क्षेत्रावर विमा योजनेसाठी बोगस अर्ज उघड झाले होते. आता आंबिया बहारामध्ये बोगस विमा अर्ज शोधले जाणार आहेत.

आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सर्व अर्जाची पडताळणी सध्या सुरू आहे. पडताळणीनंतर अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल. - शशिकांत गांगर्डे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा 

टॅग्स :पीक विमाशेतकरीफलोत्पादनफळेकृषी योजनाशेतीराज्य सरकारसरकारडाळिंबद्राक्षेकेळी