विदर्भाच्या अमरावती विभागातील काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता फुलशेतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीच्या लागवडीचे प्रमाण वाढले असून, बाजारात फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे वाढत आहे.
पारंपरिक पिकांच्या तुलनेत झेंडू, गुलाब आणि शेवंती यासारख्या फुलांना बाजारात अधिक चांगला दर मिळतो. सण-उत्सव, विवाह सोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे या फुलांना वर्षभर मागणी राहते. याशिवाय योग्य नियोजन केल्यास झाडांना तुलनेने कमी कालावधीत फुले येतात.
त्यामुळे शेतकऱ्यांना झटपट उत्पन्न मिळत असल्याने वाशिमसह अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यांमध्ये फुलशेतीला चालना मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या जिल्ह्यात कुठे फुलशेती?
विभागातील अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, भातकुली, अकोला जिल्ह्यातील पातूर, बुलढाण्यातील किनगाव राजा, यवतमाळातील जवळा आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मानोरा, मालेगाव, कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत.
वाशिम किंवा विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये कायम गर्दी राहणारे मोठे देवस्थान नाही. त्यामुळे फुलांच्या विक्रीचा प्रश्न असल्याने फुलशेतीचे प्रमाण तसे कमीच आहे. परंतु झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांना कायम मागणी राहात असल्याने काही शेतकरी फुलशेतीकडे वळल्याचे आशादायक चित्र आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.