भीमगोंडा देसाईकोल्हापूर : साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल केवळ एप्रिलपर्यंतचेच माफ झाले आहे. एप्रिल ते जून २०२४ अखेरच्या कृषी पंपाचे वीज बिल शेतकऱ्यांना शून्य आले असले तरी या तीन महिन्यांपूर्वीचे थकीत वीज बिल वसुलीची टांगती तलवार कायम आहे.
थकीत बिलासंबंधीचा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी होत आहे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी पंपाचे थकीत आणि पुढील वीज बिल माफ करण्याची घोषणा केली.
त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कृषी पंपधारकांना एप्रिल ते जून महिन्यांचे वीज बिल शून्य असे आले आहे. पण, मीटर नादुस्त, मीटर असतानाही अंदाजे वीज बिल देणे, पावसाळ्यात कृषी पंप सुरू नसताना सरासरी आकारणी अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना भरमसाट वीज बिले देण्यात आली आहेत.
नदीकाठावरील शेतकऱ्यांना, तर पावसाळ्यात वीज मीटरसह पंप घरात आणून ठेवला तरी वीज बिलाची आकारणी केली आहे. अनेक कृषी पंपधारकांचे वीज बिल थकीत आहे.
वीज बिल दुरुस्त करून द्या, याकरिता संबंधित शेतकरी वीज कार्यालयाकडे अनेकवेळा चकरा मारूनही प्रत्येक बिलात थकीत आणि चालू बिल देण्यात आले आहे.
परिणामी, वीज बिल थकबाकी कृषी पंपधारकांच्या आर्थिक कुवतीबाहेर गेली आहे. इतके अवास्तव थकीत बिल आहे. याचे काय होणार हे सध्या कोणीही सांगायला तयार नाहीत. 'महावितरण'चे प्रशासन मौन बाळगून आहे.
निवडणुकीनंतर थकीत बिल आले तरविधानसभा तोंडावर केलेल्या अनेक लोकप्रिय घोषणांमध्ये शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिल माफीचाही समावेश आहे. निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी तीन महिन्यांच्या बिलात थकीत वीज बिलाचा समावेश केलेला नाही. पण, निवडणूक झाल्यानंतर मागील थकीत वीज बिल ल आले आले तर काय करायचे ? अशी भीती कृषी पंपधारकांमध्ये आहे.
तीन महिन्यांची माफी ७९ कोटींवरजिल्ह्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतची १ लाख ३२ हजार ५८१ कृषी पंपधारकांचे एप्रिल ते जून २०२४ अखेरचे ७९ कोटी ५९ लाख २५ हजार ९७४ रुपयांचे वीज बिल माफ झाले आहे.