राज्यात वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वाधिक वृक्षलागवड व संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ४६ लाख ५८ हजार ७६८ एवढ्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव...
तालुकास्तरावर दर महिन्यास सर्वाधिक वृक्षलागवड करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. जिल्हा परिषद स्तरावर दर महिन्यास सर्वाधिक वृक्ष लावणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
तसेच जिल्हास्तरावर डिसेंबर अखेरीस संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक वृक्षलागवड व संवर्धन करणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी सन्मान होणार आहे.
ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पावसाळ्यात सर्वाधिक वृक्षलागवड करणाऱ्या ग्रामपंचायतींचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. त्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यास ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होणार आहे. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
निवडीसाठी १४ निकष
किमान नऊ महिन्यांच्या रोपांचा वापर करावा. ट्री कॉरिडॉर, मियावाकी व बिहार पॅटर्न पद्धतीने आणि सर्वाच्या सहभागातून लागवड करावी. संवर्धनासाठी वृक्षांना कुंपण, जाळी लावावी. संवर्धनाचे प्रमाण शंभर टक्के असावे. पाण्याची यथायोग्य व्यवस्था असावी. वृक्षांना क्रमांक द्यावेत.
लागवड व संगोपनासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. ग्रामपंचायतीत वृक्षलागवडीचे रेकॉर्ड ठेवलेले असावे, असे १४ निकष आहेत.