पुणे : कृषी विभागातील विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे आणि आत्माचे संचालक दशरथ तांभाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे दोन पदे रिक्त होते. त्यानंतर त्यांच्या जागी जेष्ठता सूचीनुसार नियुक्ती मिळण्याची चर्चा होती पण त्यांचे अतिरिक्त कारभार हे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील आणि फलोत्पादन संचालक कैलास मोते यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर आता या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कृषी विभागातील अप्पर सचिवांनी यासंदर्भात आदेश काढले असून विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालकपद श्री. विनयकुमार आवटे तर आत्मा विभागाचे संचालकपद अशोक किरन्नळी यांनी सांभाळावे असे आदेश काढले आहेत. दरम्यान, दोन्हीही अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील विविध पदांवर काम केले आहे.
विनयकुमार आवटे यांना पहिल्यापासूनच विस्तार विभागात आवड होती. त्यांनी जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी, शेतकरी मासिकाचे संपादक अशा अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. तर अशोक किरन्नळी यांनी कृषी विकास अधिकारी आणि फलोत्पादन विभागात काम केले आहे.
सध्या कृषी विभागात प्रक्रिया व नियोजन या विभागाचा अतिरिक्त कारभार रविंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे या विभागालासुद्धा पूर्णवेळ संचालक नाही. त्याचबरोबर कृषी आयुक्त प्रविण गेडाम यांची बदली नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी केल्यामुळे सध्या प्रभारी आयुक्त म्हणून भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागात ऐन खरिपात बदल्यांचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे.