प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयामध्ये आढळणारे फ्लेमिंगो हिंगणी प्रकल्प (ता. बार्शी) च्या पाणथळ भागामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पक्षीप्रेमिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. मात्र, हिंगणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने फार दिवस फ्लेमिंगो इथे राहतील, अशी शक्यता कमी आहे.
बार्शी तालुक्याला लाभलेल्या अपूर्व भौगोलिक स्थितीमुळे हिवाळ्यात अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी न चुकता पाणथळांच्या ठिकाणी हजेरी लावतात. तालुक्यात हिंगणी, जवळगाव, ढाळेपिंपळगाव या मध्यम प्रकल्पांसह अनेक पाझर तलाव, साठवण तलाव असल्यामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पक्षी बार्शी तालुक्यात येतात, परदेशी पाहुण्यांचा हिवाळ्यातील वाढता मुक्काम जैविक समतोल साधत असल्याने तालुक्यातील पक्षी वैभव वाढत आहे.
मात्र, यावर्षी झपाट्याने धरणातील घटणारी पाणी पातळी या पाहुण्यांसाठी धोकादायक ठरली आहे. ठरावीक पक्षी वगळता इतर पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील रोहित म्हणजेच फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांनी हिंगणी जलाशयात हजेरी लावली आहे.
बार्शी तालुक्यात पक्ष्यांसाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी समर्पण, अन्न आणि दुप्पट सुरक्षितता जाणवत आहे. त्यामुळे स्थानिकांसह परदेशी पक्षी बार्शी तालुक्यात दिसून येत आहेत. स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी या भागात आले आहेत. या परदेशी पाहुण्यांवर वनविभागाचे अधिकारी सचिन पुरी आणि बालाजी धुमाळ यांनी लक्ष ठेवले असून त्यांची सुरक्षितता जपण्यावर भर दिला आहे.
अन्नाची कमतरता
ढाळेपिपळगाव मध्यम प्रकल्प कोरडा पडला असून, हिंगणी आणि जवळगाव मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी मृत साठ्याला जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्ष्यांसाठी सहज अन्न उपलब्ध होत आहे, तर काही ठिकाणी अन्नाचीच कमतरता जाणवत आहे.
गेल्या काही वर्षापासून बार्शी तालुक्यातील हिंगणी, जवळगाव, ढाळेपिंपळगाव प्रकल्पांच्या पाणथळ भागामध्ये विविध पक्षी आढळून येत असल्यामुळे नैसर्गिक समतोल साधला जात होता. मात्र, यावर्षी पडलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निसर्गचक्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. - शशिकांत भंगुरे, पक्षीमित्र
दरवर्षी बार्शी तालुक्यातील पाणथळ भागात स्थानिक पक्ष्यांसह परदेशी पक्षीही दिसून येतात. यंदा अनेक ठिकाणी पाणीच नसल्यामुळे काही पक्षी आलेच नाहीत. त्यात फ्लेमिंगो आल्यामुळे काहीसा नैसर्गिक समतोल साधण्यास मदत झाली आहे. - विशाल गाडे, पक्षीप्रेमी