अविनाश कोळी
सांगली : अधिकाऱ्यांचे एखादे सकारात्मक पाऊल समाजासाठी किती दिशादर्शक असू शकते, याची प्रचिती सांगली- मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अनोख्या उपक्रमातून येत आहे.
त्यांनी पर्यावरणपूरक कार्ड तयार करून ते कार्यालयात येणाऱ्या सर्व लोकांकरिता उपलब्ध केले आहे. विशेष म्हणजे काम संपताच हे कार्ड पाण्यात भिजवून मातीत रोवले की त्यातून रोपटे उगवते. शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या स्तरावर वारंवार पर्यावरण रक्षणाच्या चर्चा होत असतात.
त्यासाठी वृक्षारोपणासह अनेक उपक्रमही राबविले जातात. मात्र, निमित्त असेल तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम हाती घेतले जातात. मात्र, एखाद्या गोष्टीतून सतत पर्यावरण रक्षणाचा संदेश व कृती करण्याला प्रोत्साहन देता येऊ शकेल का, असा विचार महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला. त्यातून त्यांना व्हिजिटिंग कार्डची संकल्पना सुचली. त्यांनी लागलीच ती कृतीत उतरविली.
कार्डचे वैशिष्ट्य काय?
• शुभम गुप्ता यांचे हे व्हिजिटिंग कार्ड सीड (बीज) कार्ड आहे. हे व्हिजिटिंग कार्ड पर्यावरणपूरक असून काम झाल्यानंतर हे कार्ड फेकून देण्याऐवजी भिजवून कुंडीत किंवा मातीत रोवले तर त्याचे रोपटे तयार होते. झेंडूच्या बिया यामध्ये आहेत.
• सीड पेपर हा टाकाऊ कागदापासून बनवलेला बायोडिग्रेडेबल इको-पेपर आहे. यामध्ये झाडांच्या बिया असतात आणि हा पेपर तयार करण्यासाठी कोणत्याही झाडाची कत्तल केली जात नाही.
जनतेसाठी खास कार्ड
आयुक्त गुप्ता यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आता हे कार्ड मिळणार आहे. हे व्हिजिटिंग कार्ड खास आहे.
ट्वीट होतेय व्हायरल
शुभम गुप्ता यांचे याबाबतचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ११ हजारहून अनेक जणांनी हे ट्वीट लाईक केले असून जवळपास सहाशे जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Anyone coming to my office from now on will get this card. It grows into a beautiful marigold plant when planted. #Sustainable#Green@WildLense_Indiapic.twitter.com/oHdQtUMVnK
— Shubham Gupta (@ShubhamGupta_11) June 12, 2024
व्हिजिटिंग कार्ड तर मला करावेच लागणार होते. मात्र, त्याला पर्यावरणपूरक स्वरूप देता येईल का, याचा विचार करून ते बनविले. महापालिकेत कार्यालयात हे कार्ड सर्वासाठी उपलब्ध केले आहेत. त्यातून वृक्षारोपणाची संकल्पना साकारली जाईल, अशी आशा आहे. - शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका