Join us

Wagh Baras : आदिवासी बांधवात वाघाला देव मानलं जातं, काय असते वाघबारस? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 2:07 PM

Waghbaras : आदिवासी बांधवांत वसुबारसेलाच वाघ बारस असे संबोधिले जाते. वाघबारस नेमकी कशी साजरी केली जाते, ते समजून घेऊयात... 

Diwali Vasubaras : आदिवासी संस्कृती पूर्वापार चालत आलेली आहे. अनेक परंपरा आजही आदिवासी बांधवांकडून जोपासल्या जातात. त्यातलीच एक म्हणजेच दिवाळी सणाची सुरवात असलेली वसुबारस. तर आदिवासी बांधवांत वसुबारसेलाच (Vasubaras) वाघ बारस असे संबोधिले जाते. पण ही वाघबारस Waghbaras) नेमकी कशी साजरी केली जाते, ते समजून घेऊयात... 

आदिवासी बांधवांच्या (Trible Culture) जीवनात वाघबारसीला मोठं महत्व आहे. दगडात कोरीव काम केलेल्या किंवा लाकडावर नक्षी रूपात काढलेल्या वाघोबाची अनेक मंदिरे आढळतात. विशेषतः गावच्या वेशीवर ही मंदिरे किंवा नुसतंच एका सुबक जागेवर उभे केलेले असतात. याच ठिकाणी वाघबारसीला उत्सव साजरा करतात.  खरं तर आदिवासी बांधवांनी वाघाला देवचं मानले आहे. आदिवासी बांधवांचं रक्षण, शेती मातीचं रक्षण करणारा म्हणून वाघाला आपलं मानलं जाते. म्हणूनच त्याची मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते. 

वाघबारशीच्या दिवशी गावातील नागरिक वाघदेवाच्या मंदिराजवळ जमा होतात. त्याच दिवशी सकाळी घरोघरी जाऊन तांदूळ किंवा इतर साहित्य जमा केले जाते. दिवाळीच्या हंगामात शेतातील येणारे नवीन पीके म्हणजे नागली, भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांना एकत्र करून ते वाहिले जाते. वाघदेवाच्या पूजेचा उद्देश एकच, की आदिवासी व त्यांच्या गुरे-ढोरे यांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे, याकरिता वाघदेवता आदिवासी बांधवासाठी पूजक असते. हे सर्व झाल्यानंतर जमा करून आणलेल्या साहित्यातून जेवण बनवले जाते. आलेल्या गावकऱ्यांना दिले जाते. 

“दिन दिन दिवाळी.... 

आदिवासी शेतमजूर हा पूर्वीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात वाढलेला, वसलेला आहे. आजही आदिवासी बांधव पशुपालनाला सर्वाधिक महत्त्व देतात. प्रत्येकाच्या एक बैलजोडी, गाय असतेच असते. सकाळी वाघेदेवतेची पूजा झाल्यानंतर सायंकाळी घरातल्या गायींना पुजले जाते. यावेळी सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी, म्हशी कोणाच्या लक्षीमणाच्या”!  असे वेगवेगळी गीते म्हणून वाघबारस साजरी करत असतात. 

टॅग्स :दिवाळी 2024शेती क्षेत्रशेतीआदिवासी विकास योजना