सुधीर खडसे
केशरी-पिवळसर, मातीचा गंध असणाऱ्या वायगाव हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक मानांकन (जीआय) दिले. त्यामुळे 'वायगावची हळद' अशी नवी ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे.
विदर्भाच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी युनिव्हर्स एक्सपोर्टचे संस्थापक शेतकरी पुत्र प्रवीण चांगदेव वानखडे यांनी दुबई / दक्षिण आफ्रिकेच्या अवर वेलनेस व्हिलेजच्या डॉ. रिना सुकदेव यांना आमंत्रित केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी डॉ. सुकदेव यांनी शेतकऱ्यांच्या शेताला थेट भेट देऊन निर्यातीसंबंधी चर्चा केली.
वर्ध्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक सत्र आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये वायगाव हळद उत्पादक कंपनी, विदर्भ नैसर्गिक शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषिकोन्नती शेतकरी उत्पादक कंपनी सहभागी झाले. या चर्चासत्रानंतर वायगाव आणि इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या हळदीच्या शेतात भेट देण्यात आली. यावेळी पंकज भगत व शोभा गायधने आणि पितांबर भुमडे यांनी वायगाव हळदीचे महत्त्व पटवून दिले.
इतर हळदीच्या तुलनेत वायगावची हळद सर्वोत्कृष्ट औषधी गुणधर्म असलेली हळद म्हणून ओळखली जाते. वायगाव हळदीतील कर्फ्यूमिनचे प्रमाण ६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वायगाव हळद हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये एक अत्यंत उपयुक्त घटक आहे. दक्षिण आफ्रिका, दुबईमध्ये हळदीला 'सुपरफुड' असे म्हणतात. जागतिक नामांकन असलेल्या वायगाव हळद उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे. तसेच आगामी हंगामात दुबई येथे निर्यात करणार असल्याचे डॉ. रिना सुकदेव म्हणाल्या.
यावेळी डॉ. भोयर आणि डॉ. गोडघाटे यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कंपन्यांमार्फत व्यवसायाला जोडण्याबाबत मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्वक उत्पादने उत्पादित केल्यास निर्यातीला मोठा वाव आहे, असे सांगितले. यावेळी कृषी विभाग नागपूर येथील विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्पच्या प्रज्ञा गोडघाटे, प्रकल्प संचालक आत्मा वर्धाच्या डॉ. नलिनी भोयर, कृषी पर्यवेक्षक मनोज गायधने आदी उपस्थित होते.
इंग्लंडला घातली भुरळ
तालुक्यात पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतले जाते. हळदीची चव, सुगंध व रंग सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रमाणित झाले आहे. वायगावच्या हळदीने इंग्लंडला चांगलीच भुरळ घातली आहे. पाश्चिमात्य देशांतही हळदीचे दूध पिण्याचा स्वास्थ्यविचार बळ धरत असल्याने ब्रिटनकडून या हळदीची निवड करण्यात आली आहे.