Join us

रोहिणी नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा; पेरणीपूर्व मशागत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:11 PM

रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

रत्नागिरी : रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश ठिकाणी भाजावळीची कामे अंतिम टप्प्यात आहे. भात, नागली, भाजीपाला बियाणे खरेदीसह खत खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने ७०,५७२ हेक्टर क्षेत्रावर भात, १०,२३६ हेक्टर क्षेत्रावर नागली, ७३७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये, ५५३.९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, १४४ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्य, ५१२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येते.

पेरणीपूर्व मशागतपूर्व कामाचा भाग म्हणून भाजावळीची कामे सुरू आहेत. पेरणी करण्यात येणारी जमीन भाजल्यानंतर सफाई करण्यात येते. सफाईनंतर शेतामध्ये शेण टाकण्यात येते. कुळीथ व अन्य पिके घेण्यात घेण्याऱ्या शेतात पावसाच्या सुरुवातीलाच धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात.

मृग नक्षत्राच्या प्रारंभी सुपीक जमिनीवर पेरण्या केल्या जात असल्याने पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे. पावसाळ्यात आंबा, काजू बागायतीमध्ये शेणखत, सेंद्रिय खते, रासायनिक खते घालण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे.

कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त भात बियाणी बाजारात विक्रीसाठी आली आहे भात पिकाबरोबर नाचणीचे दुय्यम पीक घेण्यात येते. नाचणी तृणधान्य, भाजीपाला कडधान्यांच्या बियाणांस मागणी होत आहे.

बाजारात हळद आल्याचे बियाणे विक्रीस उपलब्ध आहेत. जिल्हा फलोत्पादक झाल्यापासून लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नारळ लागवडही वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब काजू, नारळ, सुपारी तसेच पेरू, चिकू, मसाल्याची रोपे खरेदीस संपर्क सुरू केला आहे.

अधिक वाचा: Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

टॅग्स :खरीपपीककोकणरत्नागिरीभातनाचणीशेतकरीशेतीपाऊस