Join us

वसमत हळदीला मिळाले जीआय मानांकन; देशासह विदेशात होणार विशेष ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:37 AM

हळदीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा हळद उत्पादक शेतकऱ्यांचाही होणार फायदा

हिंगोली जिल्ह्यातील हळदीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून आता वसमत हळदीला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील नांदेड, परभणी, वाशिम, अकोला जिल्ह्यातील हळद उत्पादकांना त्यांनी उत्पादन केलेल्या हळदीला हे नामांकन रितसर प्रक्रिया करून वापरता येणार व त्याद्वारे हळद उत्पादक शेतकऱ्यांचाही चांगला फायदा होणार आहे. 

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण  केंद्राच्या माध्यमातून वसमत हळदीला “वसमत हळदी”  या नावाने जीआय मानांकन प्राप्त व्हावे यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला. याबाबतीतचा सविस्तर व अभ्यासपुर्ण प्रस्ताव सादर केला होता.

त्यामुळे या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या जीआय मानांकनासाठी असलेले निकष पूर्ण करत या हळदीला आता “वसमत हळद” या नावाने भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच या बाबतची भौगोलिक मानांकन करण्याची अधिसुची नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. दिनांक ३० मार्च २०२४ रोजी अनुक्रमांक ७८५ क्लास ३१ मध्ये प्रमाणपत्र ५७७ दि. ३०. ३. २०२४ नुसार याबाबतची नोंद व उल्लेख करण्यात आलेला आहे.

चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड 

महाराष्ट्रात भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनामध्ये बीड येथील सिताफळ, भिवापूर येथील मिरची, आंबेमोहर तांदूळ, कोल्हापुरी चप्पल, सांगलीचे बेदाणे, कारवट काठी साडी, पुरंदरचे अंजीर, देवगड हापूस, पैठण साडी, डहाणूचा घोलवड चिकू, वरली पेंटिंग, नवापूरची तुरदाळ, नाशिकचे द्राक्ष, जळगावची केळी, आजण्याची घनसाळ, पुणेरी पगडी, मंगळवेढ्याची ज्वारी, नागपूरचा संत्रा, सोलापूरची टॉवेल, जालन्याची मोसंबी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, कोल्हापूरच्या गुळ, लासलगावचा कांदा, वायगाव हळद, सोलापूर हळद यांचा समावेश आहे.

याच यादीत आता नव्याने  "वसमत हळद"  देखील दाखल झाली आहे. वसमत हळदीला भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने याचा परिसरातील अनेक हळद उत्पादक शेतकर्‍यांना लाभ होणार असून भविष्यात या परिसरात हळद प्रक्रिया उद्योग देखील भरारी घेतील.

टॅग्स :हिंगोलीशेतीशेतकरीपीक