Join us

Water Conservation : 'गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन! तलावांचे होणार पुनरुज्जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 20:23 IST

‘राज्यातील सर्व सरपंचांनी, शेतकर्‍यांनी, गावकर्‍यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात ह्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांचे मोठे सहकार्य लागणार आहे. निधीची कुठेही कमतरता पडणार नसून थेट जिल्हाधिकार्‍यांकडेच तो वर्ग करण्यात येईल.’ असे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

पुणे : "जलस्त्रोतांची मर्यादा, पाणी टंचाई यामुळे शेतकर्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी असेल तरच शेतीची उन्नती होते. म्हणून पाणी आडवणे-साठवणे, तलावांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज बनली. त्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना सर्व गावात प्रभावीपणे कायमस्वरूपी राबविण्याच्या निर्णय घेतला आहे." असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.    या योजेनांच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण' अर्थात www.shiwaar.com पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, एमडी कोमल जैन, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मृद व जलसंधारण अधिकारी तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.    मृद व जलसंधारण मंत्री म्हणाले, ‘शासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था जलसांधरणाची कामे करीत आहेत. शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्त्वात बीजेएसने या उपयुक्त पोर्टलची निर्मिती करून जलसंधारण विभागास सुपूर्द केले. या योजनेचा उद्देश, पात्रता, निकष, प्रशिक्षण अशी संपूर्ण माहिती एका क्लिकवर पोर्टलच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे. याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाला.’    ‘राज्यातील सर्व सरपंचांनी, शेतकर्‍यांनी, गावकर्‍यांनी या महत्त्वपूर्ण पोर्टलचा लाभ घेऊन आपल्या गावात ह्या योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांचे मोठे सहकार्य लागणार आहे. निधीची कुठेही कमतरता पडणार नसून थेट जिल्हाधिकार्‍यांकडेच तो वर्ग करण्यात येईल.’ असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाणी