परळी तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील जिरेवाडी, वडखेल, मालेवाडी, सोनहिवरा, करेवाडी, जळगव्हाण, औरंगपूर, सिरसाळ्यासह ३४ गाव, वाड्या- तांड्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.परळी तालुक्यात मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच पाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करू लागला आहे. तालुक्यातील गाव, वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याची भीषण समस्या जाणवू लागली आहे. अनेक गावात पाणीटंचाईच्या झळा बसणे सरू झाले आहे. पाणीटंचाई जाणवत असणाऱ्या गावातील परळी पंचायत समितीचे अधिकारी नीळकंठ दराडे यांनी सांगितले की, परळी तालुक्यातील ३४ गाव, वाडी-तांड्यांचा विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव परळी पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे. माळदरा तांडा, घोरपरदारा तांडा, सेल मलक वस्ती, नागझरी वस्ती, सेलूपरळी, इंजेगाव, वैजवाडी, कानडी, नाईकनगर तांडा, जाळी तांडा, हनुमाननगर तांडा, इनाम तांडा, गोवर्धन हिवरा, वाका जिरेवाडी, वडखेल, मालेवाडी, मांडे खेलवस्ती (अस्वलआंबा), वाका सोनहिवरा, करेवाडी, जळगव्हाण, औरंगपूर, सिरसाळा या गावांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे
ग्रामपंचायतींनी परळी पंचायत समितीकडे विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.हा प्रस्ताव परळी पंचायत समितीच्या वतीने तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. यावर निर्णय होऊन पुढील कार्यवाही होणार आहे.