Join us

देशात निम्म्या जिल्ह्यांत २०५० पर्यंत जलसंकट, या तीन पिकांसाठी सर्वाधिक वापरले जाते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:36 AM

डीसीएम श्रीराम व सत्त्व नॉलेजचा अहवाल

हवामान बदलामुळे बदललेले ऋतुचक्र, भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा, जलपुनर्भरणाकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे २०५० पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक देशांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषीक्षेत्रातील जलसंधारण क्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका अहवालात हा धक्कादायक इशारा देण्यात आला. त्यामुळे पुढील २५ वर्षांमध्ये भारतातील प्रतिव्यक्तीच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.

तांदूळ, उसासाठी वारेमाप वापर

देशात शेतीसाठी सर्वाधिक प्रमाणात पाणी वापरले जाते. भारतात उपलब्ध पाण्याचा ८० ते ९० टक्के हिस्सा शेतीसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर घरगुती तसेच औद्योगिक कारणांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. तांदूळ, गहू, ऊस या तीन पिकांसाठी सर्वाधिक पाणी वापरले जाते. शेतीसाठी पाणी नीट वापरले गेले तर २० टक्के पाण्याची बचत होऊ शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

१७% लोकसंख्या; ४% पाणीसाठा

जगातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोक भारतात राहतात. जगातील एकूण पाणीसाठ्यापैकी केवळ ४ टक्केच पाणी भारतात उपलब्ध आहेत. प्रति व्यक्त्ती १,७०० क्युबिक मीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध असेल तर त्या भागात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे असे फ्लेकेनमार्क इंडेक्समध्ये म्हटले आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असलेल्या जलस्रोतांमुळे भारतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार नाही. ७६ टक्के लोकांकडे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे देशापुढे पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची भीती डीसीएम श्रीराम व सत्त्व नॉलेजच्या अहवालात म्हटले आहे.

 

टॅग्स :पाणी टंचाईहवामानपाणी