गेल्या तीस ते पंचवीस वर्षांपूर्वी अर्धापूर तालुक्यात करडई, सूर्यफूल, भुईमूग मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; परंतु पंचवीस ते तीस वर्षांपासून इसापूर धरणाचे पाणी आल्यानंतर बागायतीचे क्षेत्र वाढले. तेव्हापासून करडई, सूर्यफूल, भुईमूग पीक नामशेष होण्यास सुरुवात झाली. कालांतराने अर्धापूर तालुक्यातून हे पिके हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.
इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध होण्याच्या या भागात रबी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू आणि करडई, सूर्यफूल, भुईमूग पिकांची लागवड केली जाते. रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांच्या ६-१२ ओळीनंतर अंतरपीक म्हणून करडईची एक- दोन ओळीत पेरणी होत असे. रबी पिकांची निवड करताना कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पीक होते. अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकाचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात करडई, सूर्यफूल, भुईमूग पिकाची लागवड केली जात होती. तेव्हा सर्वांत फायदेशीर पीक असायचे. मात्र, कालांतराने पिकांची लागवड करताना दिसत नाही.
या पिकांचे क्षेत्र घटण्याची काही प्रमुख कारणेसुद्धा आहेत. पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, तसेच इतर स्पर्धात्मक पिके ज्वारी, सूर्यफूल व करडईचे बाजारभाव इतर पिकाच्या मानाने कमी असल्याने शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या पिकांकडे वळला आहे.
पाण्यामुळे कोरडवाहू शेती झाली बागायती
१.इसापूर धरणातून १९७५ ते १९८६ या काळात कॅनलद्वारे शेतीला पाणी मिळण्यास सुरुवात आली. तेव्हा पाणी पाळ्या वीस दिवस अंतराने मिळत असे. पाणी पाळ्या कमी वेळात मिळत असल्याने कोरडवाहू शेतीही बागायती झाली. रबी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारीचा पेरा वाढला.
२.आठ ते दहा पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी केळी, हळद आणि उसाची लागवड करू लागले होते. काही काळानंतर या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक केळी झाली. केळीपासून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकरी सधन झाले. शेतकऱ्यांनी अनेक पिकांत बदल घडवून आणला. भाजीपाल्यासह अन्य पिकापासून उत्पादन काढण्यास सुरुवात झाली आहे.