Water Purification Plant :
आपल्या कुटुंबात पिण्यासाठी येणारे पाणी किती शुद्ध आहे, हे जाणून घेण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदीची सुविधा उपलब्ध केली आहे.
एका क्लिकवर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे. त्यामुळे पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होणार आहे.
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ९२२ गावांत १ हजार ६४२ नळयोजना राबविण्यात येत आहेत.
या पाण्याची वर्षातून एकदा रासायनिक तर वर्षातून दोनदा जैविक तपासणी केली जाते. मात्र, प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात तपासणी केली जाते.
जल नमुने तपासल्यावर त्याचा अहवाल आता संकेतस्थळावर पाहायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक गावातील जल नमुने घेऊन तपासणी केली जाते. त्यात अशुद्ध पाणी असल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतीस सूचना केल्या जातात.
रासायनिक तपासणीत सलग दोन वर्षे जलस्त्रोत बाधित आढळल्यास तो स्त्रोत बंद केला जातो. तसेच जैविक तपासणीत बाधित आढळल्यास आरोग्य आणि ग्रामपंचायतीमार्फत क्लोरिनेशन केले जाते.
अहवाल एका क्लिकवर...
शासनाच्या वतीने प्रत्येक गावातील जल नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. आता त्याचा अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे एका क्लिकवर पाण्याची गुणवत्ता समजणार असल्याने नागरिकांची सोय झाली आहे.
१०७५ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी...
तालुका उद्दिष्ट रासायनिक तपासणी जैविक तपासणी
अहमदपूर १४२ ११५ ११५
औसा १९७ १२४ ९८
चाकूर १५३ ६८ ६८
देवणी ७२ ३९ ३७
जळकोट १३५ ८३ ८३
लातूर १४२ १११ ११२
निलंगा २७१ २२२ २१६
रेणापूर १२६ ९५ ९५
शिरूर अनं. ७६ ६७ ६७
उदगीर ३२८ १५१ १०३
जल नमुने तपासणे आवश्यक...
बहुतांश आजार पाण्यामुळे होतात. त्यामुळे जल नमुने तपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता समजते आणि गरजेनुसार प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते.
- मोहन अभंगे, डेप्युटी सीईओ.