Join us

पाणीटंचाईच्या झळा! भूगर्भातील पाणी घटलं, जनावरांना पाणवठ्याच्या पाण्याचा आधार..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:09 PM

रब्बी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, शेतकरी चिंतेत...

मराठवाड्यात आता पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी परिसरात गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू होताच भूगर्भातील पाणी पातळी खोलवर जात असल्याने विहीर आणि बोअरमधील पाणी कमी झाले आहे.परिणामी, रब्बीची पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

परिसरात गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे विहिरींना व बोअरला काही प्रमाणात पाणी आले होते. नाही तर उन्हाळा लागण्यापूर्वीच परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असती. अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील शिवना, वेळगंगा नदी वाहिली नाही. त्यामुळे विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.

अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावरच हरभरा, गहू पिकाची पेरणी केली. ज्या शेतकऱ्यांनी टरबूज, मिरची, मोसंबी, उन्हाळी कांदा ही पिके घेतली, त्या पिकांना वेळोवेळ शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागते. आत रब्बी हंगामातील पिकांना एप्रिलपर्यं पाणी कसे द्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांन पडला आहे.

खरीप पिकांची लागवड घटणार

• यंदा फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची पातळी खोलवर गेली आहे एप्रिल आणि मे महिन्यात विहिरींचे पाणी कमी झाल्यास बागायतदार शेतकऱ्यांना ऊस, मोसंबीला पाणी देता येणार नाही.त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर खरीप पूर्व हंगामाची लागवड घटणार आहे.

• आतापासूनच पिकांना पाणी मिळत नसल्याने एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती आणस्वी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

घोसला परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

सोयगाव तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे परिसरातील पाझर तलाव मृत साठ्यावर आल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, पाळीव जनावरांना पिण्यास पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सोयगाव तालुक्यात गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, परिसरातील प्रकल्पांतील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना विशेषतः महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांनाही पाणी पिण्यास मिळत त्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार असल्याची भीती आहे, तसेच रब्बी पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :पाणी टंचाईदुष्काळपाणीकपात