Pune Farmer Water Sortage : यंदा राज्यात सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस पडला असून राज्यभरात पाण्याची कमतरता किंवा दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहायला मिळाली नाही. परंतु पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या पेरूच्या बागा सुकून गेल्या आहेत.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील शेतकरी संजय कोरडे यांची एका एकरावरील पेरूची बाग सुकली आहे. पुरंदर उपसा सिंचन प्रकल्प मागच्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे पेरूला वेळेत पाणी मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांची ही बाग सुकून गेली आहे.
संजय कोरडे यांची एका एकरावर पेरूची बाग आहे. त्यांच्या बागेला मागच्या एका महिन्यापासून पाणी नसल्यामुळे बाग सुकून गेली आहे. पेरूचा बहार धरला होता पण पाणी नसल्यामुळे फळांची वाढ खुंटली असून पानेही सुकायला लागली आहेत. यामुळे या बहारातील किमान २ लाखांचे नुकसान झाले आहे.
इथून पुढेही या तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परंतु अजून हिवाळाच सुरू आहे, उन्हाळ्याचे चार महिने बाकी असतानाच शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे पुढील पाच महिने कसे जाणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
आम्हाला पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत असते पण मागच्या अनेक दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ही योजना बंद आहे. बोअरवेल, विहिरींचे पाणीही कमी झाले असून पिकांना पाणी कमी पडत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पेरूच्या बागेतून मिळणाऱ्या २ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.
- संजय कोरडे (शेतकरी, सिंगापूर, ता. पुरंदर)