रविंद्र शिऊरकर
कमी झालेला पाऊस आणि त्यात नापिकी अतिवृष्टी तर कधी बेभाव शेतमाल विक्री यात अडकलेल्या शेतीत अडकल्याने एकीकडे शेतकऱ्यांवर नामुष्कीची वेळ ओढावल्याचे चित्र असताना काही शेतकऱ्यांनी यावर क्लूप्ती करत शेततळ्यांना जगवत शेती पिकवली आहे. शेतकऱ्यांना या वर्षीच्या रब्बी हंगामात मात्र काही शेतकऱ्यांना शेततळ्यांनी जीवनदान दिले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अनेक शेततळी असल्याने शेतकरी विविध पिके घेत असून खरिपाचा काही अंशी तोटा हा रब्बी पिकांद्वारे भरून काढत आहे.
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विहिरीतून शेततळी भरून ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा मार्ग निवडत शेती करत अद्रक, कांदा यासारखी पिकं घेत असून त्याला बाजारभावही चांगला मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
ओलिताखाली शेत जमीन पाण्याच्या कमतरतेमुळे खरिपात आधीच उत्पन्न कमी मिळाल्याने आता शेतकऱ्यांनी रब्बी लागवडी कमी प्रमाणात केल्या आहे. तर शासनाच्या विविध योजनेतून तसेच स्वखर्चाने उभारलेल्या शेततळ्यातून मात्र शेततळे असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळत आहे. खरिपात सुरुवातीला झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी आपआपले शेततळे भरून ठेवले व ते पाणी सध्या शेतकरी वापरून कांदा, आद्रक, कपाशी, गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी रब्बी पिकांना जीवदान देत आहे.
खरिपाची भरपाई रब्बी देणार खरिपात उत्पन्न कमी मिळाले मात्र आता कांदा तेजीत असून तसेच आद्रक व उन्हाळी आगाऊ मक्का तसेच ज्वारी द्वारे खरिपात झालेले काहीअंशी नुकसान किंबहुना कमी उत्पन्न शेततळ्यातील पाणी साठ्याच्या जीवावर भरून निघेल. अशी अपेक्षा बाळगतांना शेतकरी दिसून येत आहे.
दोन एकर कांदे आणि आद्रक जोमातविहिरीतील पाणी उपसून त्यातून शेततळे भरून ठेवले होते आता तेचं पाणी वापरून तुषार सिंचन च्या मदतीने लाल कांदे आणि ठिबक वरील आद्रक पीक जोमात असून हे पीक निघे पर्यँत पाणी पुरेल तसेच कांदा आणि आद्रक यास चांगला बाजार भाव असल्याने या हंगामाचा शेततळ्यामुळे फायदा होईल. - आबासाहेब बापूसाहेब जाधव शेतकरी शिऊर
आमच्या तालुक्यात पावसाचे प्रमाण गतवर्षी पेक्षा कमी असल्याने रब्बी लागवडीचे प्रमाण घटले आहे. आमच्याकडे शेततळे असल्याने मल्चिंग पेपरचा वापर करत मिर्ची, ज्वारी, हरभरा पिके घेतली असून एक एकर क्षेत्रावर उन्हाळी कांदे करणार आहोत. या पिकांना त्यांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत पाणी देऊन पिके टिकवता येईल. त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळेल. शेततळे असल्याने दुष्काळाच्या झळा असतांना शेतीची हिरवळ टिकून आहे. - संदेश बाबुराव जाधव शेतकरी वैजापूर