Join us

Weather : कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात न झाल्यास काय होतील दुष्परिणाम? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 7:12 PM

आपल्याला हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम भोगायला तयार राहावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली. (Weather)

भारताला २०३० पर्यंत ५०० गिगावॅट सौरऊर्जा निर्माण करायची आहे व २०७० पर्यंत कार्बनमुक्तीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.  मात्र, त्यासाठी सरकारकडून आवश्यक प्रयत्नच होताना दिसत नाही. 

आपला देश आधीच हवामान बदलाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे अशीच वाटचाल सुरू राहिल्यास कार्बनमुक्तीचे लक्ष्य हे दिवास्वप्न ठरेल. 

या उदासीनतेमुळे आपल्याला हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम भोगायला तयार राहावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमासाठी नागपूरला आलेल्या अतुल देऊळगावकर यांनी सांगितले. यावेळी कृषी अभ्यासक अमिताभ पावडे हेही उपस्थित होते. 

देऊळगावकर म्हणाले, भारतात बहुतेक ठिकाणी कमी कालावधीत अतिवृष्टी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत, शहरे उष्णतेची बेटे बनत चालली आहेत. 

हे सर्व हवामान बदलाचेच परिणाम आहेत, जे भविष्यात अतिशय गंभीर होणार आहेत. मात्र, यावर करण्यासाठी सरकारचे प्रयत्नच दिसत नाहीत.उलट नैसर्गिक संपत्तीची लूट हाच देशाच्या अर्थकारणाचा भाग झाला आहे. नुकत्याच झालेल्या वायनाडच्या घटनेतून हे दिसून आले. 

खरंतर युरोपीय देशांप्रमाणे उद्योगपती, श्रीमंतावर कार्बन टॅक्स लावण्याची गरज आहे, पण तसे करायला सरकार तयार नाही, अशी टीका देऊळगावकर यांनी केली.

अतुल देऊळगावकर यांनी सुचवल्या या उपाययोजना

* २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जेचे उत्पादन करणे, हे भारताचे लक्ष्य आहे. 

* सध्या देशात अक्षय ऊर्जेचे १३१ गिगावॅट उत्पादन होते. त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी विकेंद्रीकरण आवश्यक असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात सौर पॅनल बसविण्याची गरज आहे. मात्र, तशी योजना नाही.

* इलेक्ट्रिक व्हेईकलला प्राधान्य दिले जात आहे, पण त्यात विजेचा वापरच अधिक होतो.

सौरऊर्जा, हवामान बदलावर कार्यशाळा आजपासून

जागतिक संघटना अर्थ जर्नालिझम नेटवर्कच्यावतीने 'अक्षय ऊर्जा' या विषयावर २९ ऑगस्टपासून नागपुरात हॉटेल रिजेंटा येथे पत्रकारांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सौरऊर्जेसह अक्षय ऊर्जेची सद्यःस्थिती, स्थानिक स्थिती, अक्षय ऊर्जा वाढीसाठी येणाऱ्या अडचणी, भविष्यातील वाटचाल या विषयांसह हवामान बदलामुळे मानवी आरोग्य व शेतीवर होणारे गंभीर परिणाम, विदर्भातील शेतीवर होणारे परिणाम, याबाबतच्या जनजागृतीसाठी पत्रकारांची भूमिका, आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानशेतकरीशेतीपर्यावरण