Join us

मराठवाडा विभागासाठी साप्ताहिक कृषी व्यवस्थापन सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 1:31 PM

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील सात दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यानुसार शेतकरी बांधवांनी असे करावे नियोजन.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 04 ते 10 ऑगस्ट 2023 दरम्यान व दिनांक 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 09 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात तणांच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन पिकास 20 दिवस झाले असल्यास इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारवे. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिकॅनी सिलीयम लिकॅनी या जैविक बूरशीयूक्त किटकनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून हवेत आर्द्रता व जमिनीत ओल असतांना फवारणी करावी तसेच रासायनिक नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणे  करावी.

पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. हळद पिकात  जमिनीत वापसा आल्यानंतर बायोमिक्सची आळवणी करावी. आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स याप्रमाणे द्रावण तयार करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून  फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब व चिकू  बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा  झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा  दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

चारा पिके

चारा पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

तुती रेशीम उद्योग

निरनिराळया येणाऱ्या रोगामूळे रेशीम किटक मृत पावतात. चिन देशात रेशीम कोष पीकात फक्त 5 ते 6 % पर्यंत रोगामूळे कोष पिकाचे नुकसान होते तर भारतात 25 ते 30 % नुकसान होते. रोग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी हाच रामबाण उपाय होय. संगोपनगृह व संगोपन साहित्याचे वेळोवेळी निर्जंतूकीकरण 2% ब्लिचिंग पावडर व 0.3% चुना, अस्त्र, सेरी स्वच्छ, क्लोरीनडाय ऑक्साईड, सॅनिटेक 2.5% इ. निर्जंतूके यांचा वापर करावे. प्रत्येक कात भरताना कीटकांवर पांढरा चुना धुरळणी करावी व कातेवरून उठण्याअगोदर अर्धा तास निर्जंतूक विजेता पावडर शिफारसी प्रमाणे धुरळणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. कोवळे गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण  25 मिली + 100 मिली एवढे असावे.

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीन कपडे धुताना कपडयांना साबण लावणे, घासणे इ. क्रिया बसुन केल्या तर गुडघ्यांवर आणि पायांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. पारंपारिक पध्दतीने कपडे धुताना मधून मधून बसण्यासाठी स्टुलचा  वापर केल्यास शारिरीक श्रम कमी पडतात.

इतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी  दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी  झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणखरीपपीक व्यवस्थापनशेतीशेतकरी