पुणे जिल्ह्यात जून व ऑगस्ट हे दोन पावसाचे महत्त्वाचे महिने कोरडेच गेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पावसाळ्याचा आता एक महिना शिल्लक असल्याने या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब साठवण्यासाठी आता जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठीदेखील होणार आहे.
जिल्ह्यात सध्या ६२ हजार विहिरी आहेत. त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी केला जातो. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. पूर्वेकडील तसेच डोंगराळ भागातील तालुक्यांत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. महिनाभरात ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३९ गावांत ४९ टँकर सुरू आहेत. मात्र, उरलेल्या महिनाभराच्या काळात पडलेल्या पावसाचा थेंब थेंब महत्त्वाचा आहे.
काळाची हीच गरज ओळखून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ६२ हजार विहिरींपैकी सुमारे ४ हजार २७४ विहिरी पुनर्भरणासाठी पात्र ठरल्या आहेत. पुनर्भरणातून विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने त्या पाण्याचा फायदा पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी होणार आहे. अवर्षणप्रवण परिस्थितीमध्ये या पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेतून विहिरींचे पुनर्भरण करण्याचे ठरवले आहे. पुनर्भरणासाठी पात्र विहिरींसाठी तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांच्या स्तरावरच विहिरींना पात्र ठरविण्यात आहे.
महिनाभरात पडणाऱ्या पावसाचा योग्य वापर या पुनर्भरणामुळे होऊ शकणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यातून सुटू शकतो. - दीप्ती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना