गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात गुरुवारी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘शासन आपल्या दारी‘ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले असून ३५ सिंचन प्रकल्पांना नव्याने प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे,असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.