अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडी योग्य सर्व १९९० गावांतील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी ४७ पैसे आहे.
पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील खरीप पिकांच्या नजर अंदाज पैसेवारीचे प्रस्ताव जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते.
त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी सरासरी ४७ पैसे आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पुराचा तडाखा आणि सततच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे.
पावसामुळे पिकांचे नुकसानः पैसेवारी ५० पैशांच्या आत!
यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस बरसला असून, त्यामध्ये अतिवृष्टी व पुराचा तडाखा आणि सतत पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.
पैसेवारी कमी; दुष्काळी सुविधा लागू होणार?
• यंदाच्या पावसाळ्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, जिल्हयातील खरीप पिकांची नजर
अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर करण्यात आल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या सुविधा लागू होण्यासाठी मदत होणार आहे.
• दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध निकषांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हयातील
खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर होण्यास मदत होणार आहे.
सुधारित पैसेवारी पुढील महिन्यात !
जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी पुढील महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नजर अंदाज पैसेवारी प्रमाणेच सुधारित पैसेवारी राहणार असल्याची शक्यता आहे.