अनंत वानखडे
गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, अवकाळीसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी सततच्या पावसाने कहर केला आहे. बाळापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, पिकांवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
प्राथमिक फूल अवस्थेत असलेले सोयाबीन, कपाशीला फुलेच लागली नाहीत. यामुळे हातचे पीकही गेल्यात जमा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला नाही.
त्यामुळे पेरणीही टप्प्याटप्प्याने झाली. जुलैच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सतत सुरू होता. तालुक्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे शेतात नदी-नाले तुडुंब वाहत आहेत.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून, जास्त पावसामुळे पिके सडत आहेत. सततच्या पावसाने पीक फुलोरा अवस्थेत असताना फुले गळून पडली. यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना अशी वेळ आली आहे.
यावर्षी अतिवृष्टीसोबत सततच्या पावसाने कहर केला. प्रशासनाच्या वतीने लवकरच नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्यामार्फत शासनाला कळवू. - अमोल साबळे, सदस्य, जिल्हा नियोजन विकास समिती, अकोला
सततच्या पावसाने नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. मागीलवर्षी अल्प पावसानंतर हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत व पीक विमा दिला नाही. - पुरुषोत्तम तायडे, शेतकरी, कवठा
गेल्या दोन वर्षात शासनाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मदत व पीक विमा दिला नाही. - रामकृष्ण गवळी, लोहारा
या सर्कलमध्ये अतिवृष्टी
यावर्षी सततच्या पावसामुळे तालुक्यातील सात पैकी निंबा, हातरुण, पारस, बाळापूर सर्कलमध्ये वेगवेगळ्या वेळी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले व पिकांचे नुकसान झाले.
अवकाळीमुळे झाले होते नुकसान
मागील वर्षी सुरूवातीला अल्प पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन अल्पायुषी असल्याने कसेबसे कमी उत्पन्न झाले; मात्र डिसेंबर जानेवारीमध्ये अवकाळी पावसामुळे हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तूर, हरभरा, कांदा, गहू, फळबाग पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
पिक | जमीन (हेक्टर) |
सोयाबीन | २९,४०० हेक्टर |
कापूस | १७,३९० हेक्टर |
तूर | ७,५०० हेक्टर |
तालुक्यात पेरणी योग्य जमीन | ६०,६७४ हेक्टर |