यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. दुसरीकडे, पशुधनासाठी पाच- सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा त्यांना बसणार आहेत.
जि. प. पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जूनपर्यंत जिल्ह्यातील ९०२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासणार असून यापैकी ६२६ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ८३५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. यामध्ये जनावरांचे मोठे हाल होणार आहे.दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार येणाऱ्या पाच सहा महिने तरी जनावरांना चाराटंचाईची फारशी झळ बसणार नाही.
जिल्ह्यात जनावरांची स्थिती
लहान जनावरे- १,५८,२५१
मोठी जनावरे-४,७४,७५२
शेळी-मेंढी-५,१९,४२६
जनावरांना लागणारा चारा
एकंदरीत सर्व उपाययोजनांनुसार २३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. यामध्ये खरीप हंगामात १२ लाख ६८ हजार मेटिक टन, तर रब्बी हंगामात ४ लाख ४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. तसेच नैसर्गिक स्रोतांपासून २ लाख १७ हजार मेट्रिक टन चारा निर्माण झाला आहे.
याशिवाय पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे १ लाख ४१ हजार मेटिक टन चारा उपलब्ध झाला आहे. यासाठी ८ हजार ६१० शेतकऱ्यांना वैरणीचे ६०२.७० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. एवढेच नाही, तर ३ लाख १२ हजार मेट्रिक टन मुरघास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चाराटंचाईपेक्षा यंदा जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ६ लाख ३३ हजार जनावरांना दरदिवशी वाळलेला चारा ३ हजार ८४३ मेट्रिक टन एवढा लागतो • महिन्याकाठी हा चारा १ लाख १५ हजार २८१ मेट्रिक टन लागतो.