जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन आठवड्यापासून पावसात खंड पडलेला आहे. वेळेवर तसेच उशिरा पेरणी केलेल्या खरिप पिकांना जमिनीत ओलाव्याची गरज निर्माण झालेली आहे. प्रत्येक पिकाच्या विशिष्ट अशा अवस्था असतात ज्यात त्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते किंवा पावसाच्या पाण्याने जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. पिकाच्या अशा अवस्थांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था असे म्हणतात.
- सोयाबीन पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) व पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- खरिप ज्वारी पिकाच्या गर्भावस्था (पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी) पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवस) पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) या पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था आहेत. त्यानुसार अवस्था लक्षात घेऊन पाण्याचा ताण पडला असल्याने खरिप ज्वारी पिकास पाणी द्यावे.
- बाजरी पिकास पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी (फुटवे फुटण्याची अवस्था) व ५० ते ५५ दिवसांनी (पीक फुलोऱ्यात असताना) पाणी द्यावे.
- खरिप भुईमुगाच्या फांद्या फुटण्याची, आऱ्या जमिनीत उतरण्याची व शेंगा भरण्याची अवस्था यावेळी अनुक्रमे पेरणीनंतर २५ ते ३०, ४० ते ४५ व ६५ ते ७० दिवसांनी खरिप भुईमूग पिकास पाणी द्यावे.
- तुर पिकास फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी), फुलोऱ्याची अवस्था (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) व शेंगा भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी) पाणी द्यावे.
- मका पिकास रोप अवस्था (पेरणीनंतर २५ ते ३० दिवस), तुरा बाहेर पडताना (४५ ते ५० दिवस), पीक फुलोऱ्यात असताना (६० ते ६५ दिवस) व दाणे भरताना (७५ ते ८० दिवस) पाणी द्यावे.
- सूर्यफूल पिकास रोपावस्था (पेरणीनंतर १५ ते २० दिवस) फुलकळ्या लागण्याची अवस्था (३० ते ३५ दिवस), पीक फुलोऱ्यात असताना (४५ ते ५० दिवस) व दाणे भरण्याच्या अवस्थेत (६० ते ६५ दिवस) पाणी द्यावे.
डॉ. कल्याण देवळाणकर
7588036532