अजित चंदनशिवे / तुळजापूर :
तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीतील अंदाजे ३५ फूट खोल विहिरीतील ८ फूट लांब अन् १५० किलो वजन असणारी मगर पाण्याबाहेर काढण्यात वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला तब्बल १३ तासांच्या प्रयत्नाअंती यश आले.
शनिवारी(२९ सप्टेंबर) रोजी पहाटे ही मगर सुखरूप पाण्याबाहेर बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. वडगाव लाख शिवारातील तलावात काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना मगर दिसली होती.
मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष दिलेले नव्हते. असे असतानाच गुरुवारी शेतकरी महादेव शिंदे हे शेतात फवारणीसाठी गेले होते. फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी ते मारुती मंदिर ट्रस्टच्या शेतजमिनीत असणाऱ्यावर विहिरीवर गेले असता, त्यांना मगर दिसून आली.
काही क्षणात ही खबर गावात पोहोचली. अन् गावापासून एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या या विहिरीवर मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता, काही क्षणातच पथक स्पॉटवर दाखल झाले.
विहीर तुडुंब भरलेली असल्याने अशा स्थितीत मगर बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे पाणी उपसण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, विजेची सोय नव्हती. यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आर्मीचरची सोय केली.
तोवर रात्र झाली. त्यामुळे रेस्क्यूचे काम थांबवावे लागले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ग्रामस्थांनी जनरेटरची सोय केली. पाच विद्युतपंपांद्वारे विहिरीतील पाणी उपसले, तोवर उदगीर येथील रेस्क्यू पथकालाही पाचारण केले.
विहिरीतील संपूर्ण पाणी उपसल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पथकाने मगर पाण्याबाहेर काढली. या मगरीचे वजन १८० किलो तर लांबी ८ फूट होती. दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित चांधून ही मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
यानंतर यंत्रणेने ही मगर नैसर्गिक अधिवासात सोडून दिली, असे वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी 'लोकमत ऍग्रो'ला सांगितले.
पाच विद्युत मोटारींनी उपसले पाणी....
मारुती मंदिर ट्रस्टच्या ३५ फूट विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती. त्यातच विहिरीच्या जवळील नाल्यातून पाणी वाहते होते. त्यामुळे विहिरीतील पाणी निघणे शक्य नव्हते. जवळपास विजेची सोय नसल्याने ग्रामस्थांनी १२ मोटारी चालणारे जनरेटरची सोय करून शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पाच मोटारी लावून विहिरीतील पाणी काढण्यास सुरुवात केली. जवळपास १३ ते १४ तास विहिरीतील पाणी काढण्यास लागले. संपूर्ण पाणी उपसल्यानंतर शनिवारी पहाटे ५:३० वाजता मगर विहिरीबाहेर काढण्यात आली.
वनविभाग व वन्यजीवरक्षक विभागाने केले रेस्क्यू
माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ, सहायक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे, वनरक्षक विनोद पाटील यांच्यासह वन्यजीवरक्षक सेवाभावी संस्थेचे (उदगीर) सचिव बाबा सय्यद, आशिष कल्लुरे, सिद्धार्थ काळे, कान्हा पांचाळ, फेरोज
कादरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मगर सुखरूप पाण्याबाहेर काढली.
उदगीरच्या पथकाची घेतली मदत
■ वनविभागाचे अधिकारी विहिरीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी लागलीच उदगीर येथील पथकासही पाचारण केले, या दोन्ही पथकांनी ग्रामस्थांच्या मदतीने मगर विहिरीबाहेर काढली.
मगर नैसर्गिक अधिवासात...
विहिरीतील पाणी निघाल्यानंतर शनिवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू पथकाला सुखरूप मगर विहिरीबाहेर काढण्यात यश आल्यानंतर रेस्क्यू पथकाने दोरीच्या सहाय्याने बांधून वनविभागाच्या पथकाच्या ताब्यात दिले. सदरील मगर ही नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली, असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली आहे.
१३ ग्रामस्थांना सोबत घेत वन विभागाने रेस्क्यू मोहीम हाती घेतली असता, ती तब्बल तेरा तासांनी फत्ते झाली.
गतवर्षी बिबट्या अन् यंदा मगर....
मागील वर्षी तालुक्यातील अपसिंगा, कामठा, बिबट्याने धुमाकूळ घालत नागरिकांची झोप उडवली होती. तर यंदा वडगाव लाख येथे एक मगर आढळल्याने नागरिकांमध्ये काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यात मोठी नदी अथवा धरण नसतानाही मगर आली कोठून असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
पथक अन् ग्रामस्थ रात्रभर विहिरीवर
विहीर पाण्याने तुटुंब भरली होती. विजेची सोय नसल्याने जनरेटर गरजेचे होते, जमवाजमव करेपर्यंत रात्र झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी जनरेटरची सोय केली. पाच मोटारीद्वारे पाणी उपसण्यास सुरूवात केली. तेरा तासांनंतर पाणी उपसले गेले आणि शनिवारी पहाटे मगर सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आली.