दरीबडची उन्हाची तीव्रता, कमी पाऊस यामुळे कायम दुष्काळग्रस्त जत पूर्व भागात पाणी पातळीत घट झाली आहे. तलाव, विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे उद्भव साठे संपुष्टात आल्याने शेतकरी द्राक्षे, डाळिंब फळबागा जगविण्यासाठी कूपनलिकांची खुदाई करू लागला आहे.
पूर्व भागातील सर्व तलाव कोरडे पडले आहेत. सध्या तालुक्यातील जत ७१ गावे व ५२० त्याखालील वाड्या-वस्त्यांवर ८४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. द्राक्ष, डाळिंब फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन जलस्रोतांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी कूपनलिका खुदाई करू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी दिवसातून १ ते दीड फूट खाली जात आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटांपर्यंत खाली गेली आहे.
११०० फूट खोदूनही कूपनलिकेला पाणी लागत नाही. धुरळा, फुफाटा निघत आहे. अर्धा इंच लागत आहे. हे पाणी जास्त खोलीवर पाणी उपयोगीच पडत नाही. जास्त फुटावरून पाणी खेचण्यासाठी जादा क्षमतेची विद्युत मोटार लागते.
शेतकऱ्यांनी फळबागांसाठी लाखो रुपये कर्ज काढलेले आहे. सध्या पाणी कमी झाल्याने फळबागा धोक्यात आल्या आहेत. अत्यल्प पाऊस त्यात भुजल पातळी खालावल्याने दुष्काळाचे संकट गडद होत आहे.
साठवण तलाव कोरडेजत तालुक्यामध्ये पाऊस अत्यल्प झाल्याने ओढे, तलाव, विहिरी, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. संख मध्यम प्रकल्प, उटगी येथील दोड्डीनाला मध्यम प्रकल्प, भिवर्गी, मोटेवाडी, अंकलगी, दरीबडची, तिकोंडी, जालिहाळ साठवण तलाव कोरडे पडले आहेत.
जमिनीची चाळणपूर्व भागातील अनेक गावांत कूपनलिका खोदल्या जात आहेत. दरीबडची, सिद्धनाथ, संख याठिकाणी मोठ्या प्रमाणात कूपनलिका खुदाई झाली आहे. त्यामुळे जमिनीची चाळण झाली आहे.
कुपनलिकेसाठी करावी लागते प्रतिक्षाशेतकरी कूपनलिकांची खुदाई करताना स्थळ निश्चितीसाठी पाणाड्या, महाराज, देवाचा प्रसाद याचा आधार घेत आहेत. पाणी दाखविण्यासाठी हजारो रुपये उकळले जात आहेत. कूपनलिका खुदाई मशीनला चार-पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. आंध्र, केरळ, तामिळनाडू येथील मशीन गाड्या आल्या आहेत. स्थानिक एजंटला फुटावर कमिशन दिले जाते.
अधिक वाचा: तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा आगोदर करा हे नियोजन