Join us

काय सांगताय; या शेतकऱ्याच्या बागेत आढळला अर्धा किलोचा आंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:13 AM

देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे.

देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आंबा बागायतदार पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांच्या बागेतील झाडावरील एका फळाचे वजन तब्बल ५२५ ग्रॅम आढळून आले आहे. सरासरीपेक्षा दुप्पट वजन असून, झाडावरील अन्य फळेदेखील ४५० ते ५०० ग्रॅम वजनाची आहेत.

बापर्डे येथील पुरुषोत्तम नारायण नाईकधुरे यांची गावातच १०० हून अधिक झाडांची आंबा बाग आहे. या बागेतील आंबा काढणी सध्या सुरू आहे. दरम्यान, आंबा काढणी करताना एका झाडावरील फळे इतर झाडांच्या तुलनेत खूप मोठी दिसून आली.

त्यामुळे नाईकधुरे यांनी २१ मार्चला आंबा फळाचे वजन केले असता त्यांना फळाचे वजन ५२५ ग्रॅम झाले. त्यानंतर तीन दिवसांनी फळाच्या वजनात २२ ग्रॅमने घट झाली. २४ मार्चला वजन ५०३ ग्रॅम झाले.

देवगड हापूस फळाचे वजन सरासरी २०० ग्रॅम ते २५० पर्यंत असते. झाडांना योग्यवेळी पाणी दिले, खत व्यवस्थापन नीटनेटके केले तर फळाचे वजन वाढते. हे वजन देखील ३५० ग्रॅमपर्यंत जाते. परंतु पुरुषोत्तम नाईकधुरे यांच्या बागेत आढळून आलेला आंब्याचे वजन जास्त असल्याने तो कौतुकाचा विषय बनला आहे

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीकाढणीपीक