पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट टायगर'ला ५१ वर्षे पूर्ण झाली असून, याअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपायांमुळे गेल्या ५० वर्षांत वाघांची संख्या सुरुवातीच्या २६८ वरून आता ३ हजारांच्या पार झाली आहे.
'प्रोजेक्ट टायगर' मध्ये सुरुवातीला १८,२७८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील केवळ नऊ व्याघ्र प्रकल्पांचा समावेश होता. परंतु, आज यात ७५ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील ९९ टक्के अर्थात ५३ व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे.
भारतातील वाघांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली असून, ती ६ टक्के दराने वाढत आहे. जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याने वाघांचा देश म्हणून तो ओळखला जात आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
आज वाघांचा देश म्हणून ओळखल्या जात असलेल्या भारतात स्वातंत्र्यानंतर एक वेळ अशी आली होती, की वाघ वाचवण्यासाठी मोहीम राबवावी लागली. या मोहिमेला प्रोजेक्ट टायगर (व्याघ्र प्रकल्प) असे नाव देण्यात आले. प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. तेव्हा भारतात वाघांची संख्या होती अवधी २६८.
भारताने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल १९७३ रोजी प्रोजेक्ट टायगर सुरू केला. तेव्हा १८२७८ चौरस किमीमध्ये पसरलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांचा त्यात समावेश होता. आज त्यात ५३ व्याघ्र प्रकल्पांचा समावेश असून, त्याने ७५ हजार चौरस किमी क्षेत्र व्यापले आहे. प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या वर्षी भारत सरकारने एक विशेष नाणेही जारी केले होते.
या अभयारण्यांत वाघांची संख्या कमी
देशातील काही अभयारण्यांत वाघांची संख्या खूपच कमी आहे. यात पश्चिम बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्प, सातकोसिया, ओडिशाचे सिमिलिपाल आणि मध्य प्रदेशातील सातपुडा यांचा समावेश आहे.
अशी वाढत गेली वाघांची संख्या
वर्ष - एकूण वाघ)
२००६ - १,४११
२०१० - १,७०६
२०१४ - २,२२६
२०१८ - २,९६७
२०२२ - ३,६८२