Join us

डाळिंबाची फळे तडकणे समस्या आणि त्यावरील उपाय

By बिभिषण बागल | Published: September 21, 2023 3:47 PM

डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणाप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.

महाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहु क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये मर रोग, तेलकट डाग रोग, फळे तडकणे, उत्पादित आयुष्य कमी मिळणे, इत्यादी. डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणाप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.

अहमदनगर, सांगली, सोलापूर आणि नाशिक भागातल्या डाळिंब बागेत काही वर्षापासुन पक्व होणाऱ्या डाळिंब फळावर तेलकट चट्टे आणि फळे तडकण्याची विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. साधारणपणे १५ ते २० टक्के नुकसान फळे तडकण्याने होते. तडकलेली फळे जरी गोड असली तरी ती साठवुन ठेवता येत नाही आणि उशिरा विक्रीस ती अयोग्य ठरतात. फळे भेगाळल्याने फळांच्या वजनात आणि रसाच्या प्रमाणात घट होते.

फळे तडकण्याची कारणे

  • फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये चुकीचे पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड, हवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी.
  • अतिशय हलक्या जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची लागवड.
  • जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असणे.
  • जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असणे.
  • हवेतील तापमान व आर्द्रतेत विशेषतः रात्र व दिवसातील तापमानात होणारी तफावत.
  • अवर्षणासारखी परिस्थिती जास्त कालावधीसाठी राहिल्यास फळांची साल कडक होते. अशा परिस्थितीत एकाएकी पाऊस झाल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास फळांच्या तडकण्याच्या प्रमाणात वाढ होते.

उपाययोजना 

  • डाळींबासाठी मध्यम, निचऱ्याची जमीन निवडावी, रोपांची लागवड ही २ x २ x २ फुट लांबी x रुंदी x खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये माती + २ घमेले कुजलेले शेणखत + १/२ किलो सुपर फॉस्फेट + ५० ग्रॅम फोरेट यांचे मिश्रण करून खड्डे भरून रोपांची लागवड करावी.
  • माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा खड्डा घेऊन प्रत्येक एक फुटातील मातीचा पहिला थर, दुसरा थर आणि तिसऱ्या फुटात माती असल्यास तिसरा थर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.
  • माती परीक्षण अहवालाप्रमाणे सामू हा ६.५ ते ८.० पर्यंत असावा, विद्युत वाहकता (क्षारता) ही ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात १२ टक्केपेक्षा कमी असावे.
  • माती परीक्षणावरून डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ४ ते ५ घमेले तसेच ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापूर्वी दयावे व उर्वरित नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून दयावी. पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोस च्यावेळी व उर्वरित मात्रा बहारानंतर ४५ दिवसांनी आळे पद्धतीने द्यावी.
  • जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण ५ टक्केपेक्षा कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दयावे म्हणजे या खताद्वारे स्फुरदाव्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो तसेच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर प्रति झाड २५ ग्रॅम प्रमाणे करावा.
  • सूक्ष्मअन्नद्रव्ये उदा. जस्त, लोह किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये स्लरीद्वारे उदा. एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण + ५ लिटर गोमुत्र + ५ किलो फेरस सल्फेट + ५ किलो झिंक सल्फेट + २ किलो बोरिक एसिड एकत्र आठवडाभर मुरवून ७ व्या दिवशी झाडांना स्लरी द्यावी.
  • फुले येण्यापुर्वी व ५० टक्के फुले असताना झाडांवर फुले मायक्रो ग्रेड-II या द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेडची फवारणी करावी.
  • बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आर्द्रतेवर नियंत्रण राहील.
  • जमिनीच्या पोतानुसारच पाण्याचे नियोजन करावे शक्यतो ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा व पाण्याचे नियंत्रित वापर करावा डाळिंबास जास्त पाण्याचा वापर करू नये. काळ्या जमिनीत निचऱ्याची व्यवस्था करावी.
  • तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी (५० ग्रॅम बोरिक एसिड + १० लिटर पाणी) तसेच ड्रीपद्वारे २ किलो कॅल्शियम नायट्रेट २०० लिटर पाण्यातून एकरी फळ फुगवणीच्या काळात सोडावे.
  • फळांची फुगवण तसेच रंग, चव चांगली येण्यासाठी फळ पक्वतेच्या काळात पोटॅशियम शोनाईट २ किलो + २०० लिटर पाण्यातून ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळा दयावे.
  • फळावर इंग्रजी L किंवा Y अक्षराच्या आकाराचे फळे हे तेलकट डागामुळे (तेल्या रोगामुळे) तडकतात त्यासाठी विद्यापीठाने तेलकट डाग नियंत्रणासाठी वेळापत्रक दिले आहे त्याचा वापर करावा.
  • जैविक खतांचा वापर रोग/किडी येवु नये म्हणुनच प्रतिबंधात्मक दृष्ट्या दरवर्षी करावा उदा. (ट्रायकोडर्मा/पीएसबी इ.)

अशाप्रकारे वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचा डाळिंब उत्पादित आयुष्य वाढविण्यासाठी व फळे तडकण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, कारण याद्वारे १५ ते २० टक्के डाळिंब फळांचे नुकसान टाळता येवु शकते.  

डॉ. अनिल दुरगुडे आणि डॉ. प्रकाश तापकीरमृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी९८२२५९८९६४

टॅग्स :फळेशेतीशेतकरीपाणीखतेसेंद्रिय खतसोलापूर