Join us

काय म्हणता; फळांचा राजा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 3:42 PM

थेट आंबा उत्पादक शेतकरी बांधवरून खरेदीला अनेकांची पसंदी

पुरुषोत्तम नागपुरे

फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा हे फळ आहे. ऐन उन्हाळ्यात आंबा विक्रीसाठी येतो; परंतु बाजारात विक्रीसाठी येणारा हा आंबाच आज नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. शेतातून विक्रीसाठी बाजारात येणाऱ्या आंब्याला पिकविण्यासाठी आजकाल औषधींचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे.

उन्हाळी फळ आणि फळांचा राजा म्हणून ओळख असलेले फळ म्हणून आंब्याची ओळख आहे. उन्हाळा आला की, बाजारात आंब्याच्या गाड्या लागतात. आंब्याचे लंगडा, तोतापुरी, केशरी आणि हापूस आदी विविध प्रकार आहेत. आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असल्याचे जुन्या पिढीपासून जाणकार सांगतात. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे असल्याचे जाणकारांनी अनेकवेळा अनुभवाचे विश्लेषण करून सांगितलेले आहे; परंतु आंबा पिकविण्यासाठी सध्या घातक रसायनांचा वापर केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिकूनही गावरान आंबा लागतो आंबटच

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील अनेक गावे पूर्वी आमराईसाठी प्रसिद्ध होती. या गावांत पारंपरिक पद्धतीने गावरान आंबा पिकविला जायचा ज्यासाठी गवताचा, पोत्यांचा वापर होत असे परंतु अलीकडे बागा कमी झाल्याने या परिसरातील नागरिकांना देखील आता बाहेर आंबा विकत घ्यावा लागत आहे. विशेष की, हा गावरान आंबा पूर्ण पिकलेला असला तरी काही अंशी आंबटच लागायचा यातुलनेत आता मिळणारे आंबे चवीला अधिकाधिक गोड असतात.   

अवकाळीने पिकांना बसतोय फटका

सततच्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आंब्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा लवकर पिकविण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात येतो; परंतु या रसायनाच्या वापरानंतर बाजारात विक्रीसाठी गेलेला आंबा हा जणू जहराचे काम करतो. रसायनांच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

नैसर्गिक पद्धतीचा पडला विसर

पूर्वी आंबा पिकवण्यासाठी तणस, गवत किंवा झाडांच्या पानांचा वापर केला जायचा. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. शरीराकरिता हेच आंबे अत्यंत उपयुक्त ठरत होते; मात्र आता झटपट आंबा पिकवण्यासाठी नफा कमवण्यासाठी होत असलेल्या, स्पर्धेत आंब्यातील नैसर्गिक गुणधर्म लुप्त होत आहे.

बाजारात आंब्याची आवक वाढली

सध्या आर्वीच्या बाजारपेठेत या आंब्याची आवक वाढली आहे. रासायनिक द्रव्याने न पिकवण्यात आलेल्या आंब्यांना खरेदी करताना, ग्राहक प्राधान्य देत आहेत; परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे निरोगी आरोग्य, हा हेतू केंद्रस्थानी ठेवून योग्य पाऊल उचलण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक ग्राहक थेट शेतकरी बांधवांच्या बांधवरून खरेदीला प्राधान्य देत आहे. 

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :आंबाअन्न व औषध प्रशासन विभागआरोग्यशेतीशेतकरी